पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या मनोमिलनाला लक्ष्मण जगताप अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:16 PM2019-03-19T18:16:41+5:302019-03-19T18:18:19+5:30
शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी शिवसेना व भारतीय जनता पक्षाची उमेदवार जाहिर झालेला नाही. शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
‘बाहेर गावी असल्याने शहराध्यक्ष जगताप उपस्थित नसल्याचे सांगून पालकमंत्री गिरीश बापट यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.शिवसेना-भाजपमधील कटुता संपल्याचे युतीचे राज्यस्तरीय नेते सांगत असले तरी पिंपरी-चिंचवडमधीलभाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसून येत आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदार संघातील भाजप-शिवसेना पदाधिका-यांची आकुर्डीत बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष, आमदार बाळा भेगडे, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, जिल्हाप्रमुख मावळ गजानन चिंचवडे, महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते. यावेळी ‘‘शिवसेना-भाजपचे भांडण नव्हते. दोन्ही पक्षांनी ताकद वाढविली. त्यात काहीही गैर नाही. शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. पण गाफील राहयाचे नाही, असेही बापट यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
युतीच्या मनोमिलनाला खोडा...
लोकसभा निवडणूकीसाठी युती झाली असली तरी मावळमधील खासदार बारणे आणि भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यात मनोमिलन होणार का? याबाबतची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. भाजपाने मावळवर दावाही केला आहे. तसेच आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यातच युतीच्या बैठकीस जगताप अनुपस्थित होते. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांना विचारले असता, ‘‘वैयक्तिक कामानिमित्त शहराध्यक्ष बाहेर गावी गेले आहे. याची कल्पना त्यांनी आम्हाला दिली होती. त्यामुळे ते अनुपस्थित आहेत.’’