By admin | Published: February 1, 2017 06:55 PM2017-02-01T18:55:12+5:302017-02-01T18:55:12+5:30
आघाडीही फिस्कटली
Next
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून युती आणि आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून राष्टÑवादीने काँग्रेसशी आघाडीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गणेशोत्सवाच्या आरतीपासून याबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्टÑवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चेच्या पाच फेºया झाल्या.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असतानाही आघाडीबाबत निर्णय होत नसल्याने काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अस्वस्थ होते. सर्वांना आघाडी कधी होणार? किंवा काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, जागांच्या संख्येवरून आघाडीची चर्चा थांबवली आहे. सुरूवातीला राष्टÑवादीने विद्यमान नगरसेवक, त्यांच्याकडे आलेले नगरसेवक असा फार्मुला मांडला होता. मात्र, त्यास काँग्रेसचा विरोध होता.
महापालिका निवडणूकीसाठी १२८ पैकी पन्नास टक्के जागा द्याव्यात, अशी मागणी सुरूवातीला झाली. त्यानंतर पन्नास जागा, चाळीस जागा आणि तीस जागा अशीही मागणी केली. प्रभागांनुसारही चर्चा झाली. त्यामुळे याबाबत तोडगा निघेल असे वाटत असतानाच आघाडीची चर्चा थांबली आहे. मंगळवारी रात्री वाघेरे आणि साठे यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी जागांच्या संख्येवर चर्चा झाली. चाळीस जागांऐवजी वीसच जागा काँग्रेसला देऊ अशी भूमिका राष्टÑवादीने घेतली. त्यावर तीस तरी जागा द्या, अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र, वीस जागांपेक्षा अधिक जागा वाढवून देण्याची भूमिका राष्टÑवादीने घेतल्याने चर्चा थांबली. महापालिका निवडणूकीत जागांच्या मुद्यांवरून आघाडी होणार नसल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.
काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत चर्चेच्या पाच फेºया झाल्या. आम्ही सुरूवातीला ६४, त्यानंतर पन्नास, त्यानंतर चाळीस आणि शेवटी तीस जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस पक्षाला वीस जागा देणे हे अपमानास्पद आहे. राष्टÑवादी काँग्रेस भूतकाळीत रमलेली आहे. तिला वर्तमानाचे भान नाही. मतदारांना ग्राह्य धरले जात आहे. याचे उत्तर भविष्यात निश्चित मिळेल.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस
महापालिका निवडणूकीसाठी राष्टÑवादी आणि काँग्रेसची आघाडी होणे गरजेचे होते. त्यानुसार चर्चाही झाली. प्रभागांनुसारही चर्चा केली. चर्चेत आम्ही विद्यमान नगरसेवक आणि आमच्याकडे आलेले नगरसेवक एवढ्या जागा मागून वीस जागा काँग्रेसला सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे चर्चा थांबली आहे. सन्मानपूर्वक लढत होईल.