निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंड पेरॉलवर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: February 5, 2024 05:44 PM2024-02-05T17:44:20+5:302024-02-05T17:46:33+5:30
दानवे म्हणाले, मराठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. म्हणूनच आज मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येते आहे.
पुणे आणि पिंपरी- चिंचवडच्या पोटनिवडणुकी वेळी तुरुंगातून अनेक गुंडांना सोडवण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हॉटेलमध्ये जाऊन भेटीगाठी घेतल्या, याची माहिती आमच्याकडे आहे. त्या गुंडांची चौकशी झाली पाहिजे. सर्रास या गुंडाचा वापर निवडणुकीत होतो, तुरुंगात असणारे गुंड पेरॉलवर सोडले जात आहेत. सर्वसामान्य जनतेच्या मनात धाक निर्माण करायचा आणि राजकीय हित साधायचे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप-शिंदे सरकारवर केला.
आकुर्डीत शिवसेना (ठाकरे गट) यांचा जनता दरबार झाला. यावेळी दानवे य़ांनी माध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, मराठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. म्हणूनच आज मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येते आहे. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. छगन भुजबळ यांना त्यांच्याच पक्षाने सोडलेलं आहे, हे त्यांना कळत आहे.
फडणवीस यांचा वचक नाही...
दानवे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा बॉस वर्षा आणि सागर बंगल्यावर बसल्याने लोकांना गोळ्या घालतायत, जीव घेतायत, गुंडांच्या गळ्यात गळे घालत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिला नाही. महराष्ट्रात फडणवीस यांच्या कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही. केवळ राजकारणात गुंतलेले आहेत. सध्या ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांनाच ते विनंती आणि अर्ज करतायत, ज्यांनी पन्नास खोके देऊन आमदार फोडले त्यांना तुम्ही काय तक्रार करणार? असेही दानवे म्हणाले.
गुंडाचं उदात्तीकरण केलं जातं आहे...
दानवे म्हणाले, भाजप आमदारच गोळीबार करतोय, ज्याला गोळ्या घातल्यात तोही धुतल्या तांदळाचा नाही. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे वर्ष बंगल्यावर पुण्यातील कुख्यात गुंडा भेटतात, तेच उत्तर देतील. तपासणी करून आत सोडतात, तरीही आशा प्रकारे गुंड जात असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यातील गुंडांचे उदात्तीकरण केलं जात आहे. हे चुकीचे आहे, असे गुंड मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जात असतील तर हे राज्य गुंडांचे आहे, असा आरोपही दानवे यांनी केला.