पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेकडे नेत्यांची पाठ; भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:59 PM2023-09-07T19:59:23+5:302023-09-07T20:00:19+5:30

या यात्रेकडे शहरातील भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. प्रसिद्धीसाठी ‘इव्हेंट’च्या शोधात असणारे भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यापासून दूर का राहिले, असा प्रश्न उपस्थित होत आहे....

Leaders back to Pankaja Munde's Shiv Shakti Parikrama Yatra; BJP leaders and activists away | पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेकडे नेत्यांची पाठ; भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते दूर

पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेकडे नेत्यांची पाठ; भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते दूर

googlenewsNext

- ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा बुधवारी (दि. ६) पिंपरी-चिंचवड शहरातून जात होती. या यात्रेकडे शहरातील भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. प्रसिद्धीसाठी ‘इव्हेंट’च्या शोधात असणारे भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यापासून दूर का राहिले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपचे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे मागील दोन महिन्यांपासून सोशल मीडिया, माध्यमे, राजकीय चर्चा यापासून लांब होत्या. भाजपच्या अंतर्गत वादामुळे त्यांनी यावर बोलणे टाळले. मध्यंतरी त्यांनी राजकीय सुट्टी जाहीर करत दोन महिन्यांची रजा घेतली. आता पुन्हा त्या राजकारणात सक्रिय झाल्या असून, शिवशक्ती परिक्रमा सुरू केली आहे. या दौऱ्याला औरंगाबाद-नाशिक जिल्ह्यांप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानी भाजपचे शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे केवळ स्वागत केले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

शहरात मुंडेंनी भाजप रूजवली, पण...

पिंपरी-चिंचवड शहरात भाजप रुजवण्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह मावळातही मुंडेप्रेमी गट आहे. आमदार उमा खापरे, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, राजू दुर्गे हे मुंडे गटाचे खंदे समर्थक समजले जात. मात्र, सध्या भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चलती आहे. त्यामुळे त्यांचा विरोध कोण पत्करणार, यामुळे भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही पाठ फिरविल्याची चर्चा आहे.

मराठवाड्यातील संख्या अधिक

शहरात विशेषत: भोसरी मतदारसंघात मराठवाड्यातील नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यातही बीड जिल्ह्यातील नागरिक आळंदी, दिघी, भोसरी उपनगरांत आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा दौरा असला तर गर्दी ठरलेली असायची. त्यामुळे येथे पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता होती.

Web Title: Leaders back to Pankaja Munde's Shiv Shakti Parikrama Yatra; BJP leaders and activists away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.