बैलगाडा आंदोलनात नेत्यांचा कलगीतुरा
By admin | Published: January 23, 2017 02:33 AM2017-01-23T02:33:49+5:302017-01-23T02:33:49+5:30
बैलगाडा शर्यतबंदीविरोधात सर्वपक्षीय नेते शनिवारी चाकण येथे एकवटले. मात्र मिळालेल्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी
चाकण : बैलगाडा शर्यतबंदीविरोधात सर्वपक्षीय नेते शनिवारी चाकण येथे एकवटले. मात्र मिळालेल्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करणार नाही ते नेते कसले? मिळालेल्या प्रत्येक व्यासपीठाचा नेते राजकारणासाठी वापर करताना दिसतात. त्यासाठी दशक्रियेचा घाटही अपवाद नसतो. नुकत्याच आलेल्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे पहिल्यांदाच सर्वपक्षीय नेते बैलगाडा आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या व्यासपीठावरून ते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
या वेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीचे राजकारण करीत कित्येकांनी खासदारकी व आमदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवला. परंतु अजूनही या शर्यतीकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. निवडून आल्यावर एक महिन्यात बैलगाडा शर्यत चालू करतो म्हणणाऱ्यांनी आता राजीनामे द्यावेत, असे म्हणताच सर्व उपस्थितांच्या नजरा खासदार आढळराव यांच्याकडे वळल्या. यावर शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी मोहिते यांच्याकडे कटाक्ष टाकून म्हणाले की, हे बैलगाड्यांचे आंदोलन आहे, बैलगाडामालकांच्या मागे उभे राहायचे असेल तर मागचं काही काढू नका. बैलगाड्याच्या आंदोलनासाठी सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी राजकीय जोडे बाहेर काढून आंदोलनासाठी एकत्र यावे. या ठिकाणी राजकारण करू नये, असा टोला मारला.
त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा सुरू करण्यासाठी आतापर्यंत काय काय केले, याचा अक्षरश: पाढाच वाचून दाखविला. ते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीमध्ये कुणी राजकारण आणू नये. आपण चारजण एकमेकांवर टीका करतोय, ठेवा राजकारण बाजूला.... क्षणभर स्तब्ध होऊन... आता कोणत्याच पक्षाचा आवाज काढायचा नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, बीजेपी, काँग्रेस कुणीच जिंदाबाद नाही. सगळे मिळून सुप्रीम कोर्टात लढा देऊ.
आंदोलन संपल्यानंतर भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे आंदोलनस्थळी उशिरा पोहोचले. त्या वेळी इतर पक्षांचे नेते निघून गेले होते. लांडगे येताच भाजपचे नेते शरद बुट्टे व तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्यात जान आली अन् ते त्यांना बिलगले. त्यांनी पुन्हा वैशाली कॉम्प्लेक्ससमोर आंदोलन सुरू केले आणि राजकारण न करता बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वच नेत्यांनी राजकारण
बाजूला ठेवून बैलगाडा मालकांच्या मागे खंबीर उभे असल्याचे सांगितले, यात मात्र शंका नाही.
सगळ्या नेत्यांनी सांगितले असले तरी कोण कुणाच्या मागे जातो हे अखेरपर्यंत सांगता येत नाही, त्यामुळे बैलगाडामालकांपुढे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न उभा राहिला आहे.(वार्ताहर)