थकबाकीदारांच्या घरी लाइनमनने पाडला ‘उजेड’
By admin | Published: June 6, 2016 12:27 AM2016-06-06T00:27:27+5:302016-06-06T00:27:27+5:30
वीज बिलाची थकबाकी असतानाही त्याच ठिकाणी त्याच ग्राहकांना नवीन वीजमीटर जोड देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या भोसरी विभाग देहू-आळंदी रस्ता येथे
पिंपरी : वीज बिलाची थकबाकी असतानाही त्याच ठिकाणी त्याच ग्राहकांना नवीन वीजमीटर जोड देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या भोसरी विभाग देहू-आळंदी रस्ता येथे हे जोड दिले गेले आहेत. महावितरणच्या लाइनमनने हे जोड बेकायदापणे दिल्याचे समोर आले आहे. यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे.
देहू-आळंदी रस्ता, चिखली, जाधववाडी येथील गट क्रमांक ११६ सल्लाउद्दीन सफी मोहम्मद शहा (ग्राहक क्रमांक १७१५६१३८४११७) आणि गट क्रमांक ३४ येथे याकुब एन्टरप्रायेजस (वाय. एम. मत्ताअल्लाहखा) (ग्राहक क्रमांक १७१५६१३८२२२०) या नावाने वीजजोड होती. शहा यांनी ६ हजार ९४० रुपये आणि मत्ताअल्लाहखा यांनी ८ हजार ३८० रुपये बिल थकवले होते. ही थकबाकी वसूल न करताच त्याच नावाने पुन्हा त्यांना नवीन वीजजोड देण्यात आले आहेत. त्यांचा ग्राहक क्रमांक अनुक्रमे १७१५६१७३४६९० आणि १७०१०७७३९१३३ असा आहे.
तसेच, याच भागातील महादेव एस. जाधव यांच्या नावाने असलेले (ग्राहक क्रमांक १७१५६१७३४०११) सुमारे ३ हजार ५६० युनिटचे बिल थकीत होते. ही थकबाकी वसूल न करता तेथील मीटर परस्पर गायब करण्यात आला. सध्या त्याच व्यक्तीच्या नावाने त्याच ठिकाणी नवीन मीटरजोड देण्यात आला आहे.
सदर प्रकारात महावितरणच्या कर्मचारी लाइनमनने दिशाभूल करून, संगनमत करून, हे नवे वीजमीटर जोड दिल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे. नवीन वीज मीटरजोड देताना संबंधित विभागातील लाइनमन पाहणी करतो. मागील थकबाकी आहे का, हे तपासतो. त्याच्या अहवालावरुन मीटरजोड देण्याचा निर्णय सेक्शन इंजिनिअर घेतात. इंजिनिअर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करीत नाहीत. त्याचा फायदा घेत लाइनमनने हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार झाला असून, त्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे. याचप्रकारे अनेक घटना शहरात घडत आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी सौंदणकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)