पॅटीसमध्ये आढळल्या अळ्या आणि बुरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:54 AM2018-10-16T01:54:31+5:302018-10-16T01:55:07+5:30
तळेगाव दाभाडे : उघड्यावर होणारी पदार्थ विक्री, मुदतबाह्य पदार्थ आणि कमालीच्या अस्वच्छतेमुळे तळेगाव दाभाडे येथील साईदीप बेकर्स अँड स्वीट ...
तळेगाव दाभाडे : उघड्यावर होणारी पदार्थ विक्री, मुदतबाह्य पदार्थ आणि कमालीच्या अस्वच्छतेमुळे तळेगाव दाभाडे येथील साईदीप बेकर्स अँड स्वीट या दुकानास नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने सोमवारी कारवाई केली. या वेळी खराब झालेल्या पॅटीसमध्ये अळ्या व बुरशी सापडल्याने विक्रेत्याच्या दुकानाला सील ठोकले. मावळ तालुक्यातील ही घटना असली, तरी उघड्यावर व अस्वच्छ परिसरात पदार्थ विक्रीचे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातही राजरोस सुरू आहेत. या प्रकाराला तातडीने आळा घालण्याची आवश्यकता आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अशी, दीपेश धनाजी जाधव (वय १९, रा. भेगडे आळी, तळेगाव दाभाडे) याने या बेकरीतून सकाळी आठ पॅटिस पार्सल खरेदी केले. मात्र, त्यावर अळ्या व बुरशी असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. ही गंभीर बाब सामाजिक कार्यकर्ते राहुल सुरेश भेगडे आणि सचिन बिराजदार यांना समजताच त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुकानात जाऊन खातरजमा केली. त्यानंतर बेकरीविरोधात अनेक युवक आक्रमक झाले होते. दरम्यान, घटनास्थळी ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे व राहुल भेगडे यांनी भेट देऊन संतप्त झालेल्या युवकांना शांत केल्याने पुढील अनर्थ टळला.
आरोग्य विभागाचे निरीक्षक प्रमोद फुले हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले. खबरदारी म्हणून प्रमोद फुले यांनी बेकरीस सील ठोकले आहे. जप्त केलेला माल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे फुले यांनी सांगितले. तळेगाव शहरातील सर्व बेकरी व स्वीट मार्टच्या स्वच्छतेची पाहणी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी राहुल भेगडे यांनी केली आहे.