मावळ परिसरातील सांगवडे येथे ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:39 PM2020-03-03T13:39:03+5:302020-03-03T13:44:08+5:30
ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना दिसली उसात बिबट्याची दोन पिल्ले
गहुंजे : मावळ भागातील सांगवडे येथील महेश लिमन या शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरु आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ऊस तोडणी कामगारांना ऊस तोडत असताना बिबट्याची दोन पिल्ले ( बछडे ) आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मावळचे परिक्षेत्र वन अधिकारी व कर्मचारी सांगवडेत दाखल झाले असून पिल्लांच्या आईची आणि त्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात पवन मावळातील सांगवडे , दारुम्बरे भागात अनेक शेतकऱ्यांना व काही तरुणांना बिबट्या दिसला होता. कासारसाई -दारुम्बरे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या परिसरात शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना, स्थानिक शेतकर्यांना बिबट्याला पाहिल्याचे सांगितले जात होते. तसेच सांगवडे येथील माजी सरपंच सुरेश राक्षे यांच्या पॉली हाऊसजवळ बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांकडून तक्रार येताच या भागात येऊन पाहणी केली होती. मात्र त्यांनतर काही महिने बिबट्या शेतकऱ्यांना दिसला नसल्याचे सांगण्यात आले होते.
मंगळवारी ( दि. ३) सकाळी सांगवडे येथील शिवारात महेश लिमन यांच्या शेतात ऊस तोडणी करताना कामगारांना उसात बिबट्याची दोन पिल्ले असल्याचे आढळून आल्याने त्यांनी तातडीने लिमन यांना कळविले. लिमन यांनी मावळचे वन विभागास कळविल्यानंतर मावळचे परिक्षेत्र वन अधिकारी सोमनाथ ताकवले यांच्यासह वन विभागाचे संबंधित सर्व कर्मचारी या भागात दाखल झाले आहेत. वन विभागामार्फत आई व दोन्ही पिल्लांची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याचे ताकवले यांनी सांगितले आहे.
स्थानिक शेतकरी झाले भयभीत..
सांगवडे भागातील शिवारात उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले शेतकरी भयभीत झाले असून शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या भागात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे .