पिंपरी-चिंचवड: उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:54 PM2022-01-24T14:54:52+5:302022-01-24T14:59:15+5:30
शेतात बिबट्याची तीन मादी पिल्ले आढळली...
हिंजवडी : आयटीनगरी जवळील नेरे गावठाण परिसरात पुन्हा बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत. सोमवार (दि.२४) रोजी सकाळी सातच्या सुमारास नेरे गावठाण येथील सीताई बंधाऱ्या जवळील मोहन जाधव, राहुल जाधव यांच्या उसाच्या शेतात बिबट्याची तीन मादी पिल्ले आढळून आली. जाधव यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानुसार पौड वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडुरंग कोपनर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गणेश सोरटे यांनी घटना स्थळी तत्काळ धाव घेऊन मादी पिल्ले ताब्यात घेतली.
दरम्यान, सदर बिबट्याची पिल्ले मादी प्रकारची असून, त्यांचे वय अंदाजे पंधरा ते तीस दिवसापर्यंत आहे. ती पिल्ले खूप लहान असून मादी शिवाय राहू शकत नसल्याने त्यांना पुन्हा सायंकाळी आहे त्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले.
मागील अनेक महिन्यांपासून नेरे दत्तवाडी, जांबे, सांगावडे, कासरसाई, कुसगावं, दारुंब्रे परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे वारंवार उघड झाले आहे. अनेक ठिकाणी बिबटे मादी, पिल्लां समवेत कळपाने फिरताना निदर्शनास आले आहे. आजतागायत बिबट्यांनी माणसावर हल्ला केला नसला तरी, परिसरातील शेकडो कुत्री, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, पाळीव जनावरांचा फडशा पडलेला आहे. रात्री अपरात्री शेतात जाताना एकट्याने जाणे टाळावे, खबरदारी घ्यावी असे आवाहन शेतकरी राहुल सीताराम जाधव यांनी केले आहे.