बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार ; गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 10:47 AM2018-12-16T10:47:53+5:302018-12-16T10:49:39+5:30
कामशेत जवळील टाकवे खुर्द गावामध्ये बिबट्याने घाेडीची शिकार केल्याने गावामध्ये दहशतीचे वातावरण आहे.
कामशेत : कामशेत जवळील टाकवे खुर्द गावामध्ये बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याची बातमी लोकमतने प्रकाशित केली होती. यावर सर्च चालु असल्याचे वन विभागाने सांगितले असतानाच शुक्रवार (दि. १४) रोजी गावातील शाळेच्या मागच्या बाजुला असलेल्या धनगराच्या घोडीवर रात्री हल्ला करून बिबट्याने तिची शिकार केली.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले टाकवे गावाच्या उत्तरेकडे मोठा डोंगर असून या परिसरात घनदाट जंगल आहे . या भागात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जंगलामध्ये पाण्याची वानवा आहे. या भागातून पाण्याच्या शोधात बिबटे गावात आल्याचा अंदाज स्थानिक गावकरी व्यक्त करत आहे. शेतकरी उशिरापर्यंत शेतात काम करत असतात. त्यातच बिबटा आढळल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच एका घोडीवर बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे गावातील पाळीव जनावरे किती सुरक्षित आहेत हाच नेमका प्रश्न असून वन विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडण्याअगोदार सर्च ऑपरेशन करून व पिंजरा लावुन बिबट्यांना पकडावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासुन याठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिसराची पाहणी करून वन विभागाकडून दोन टीमची नियुक्ती केली गेली होती. परंतु पुढे या टीमला काहीच हातात लागले नाही व आज एका घोडीचा हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यु झाला.
याबाबत बाेलताना शिराेताचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मारणे म्हणाले, प्राथमिक माहितीत हा हल्ला बिबट्यानेच केला असावा असा अंदाज आहे. घोडीला शवविच्छेदन करण्यास न पाठवता त्या ठिकाणी एक कॅमेरा लावून पुन्हा खाण्यास बिबटया येतो का ते पाहत असुन नागरिकांनी सतर्क राहावे व रात्री फिरणे टाळावे असे आवाहन केले आहे.