नवोदितांना वाद्यवादनाचे दिले धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:41 AM2018-02-24T01:41:52+5:302018-02-24T01:41:52+5:30
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे दोन दिवसीय संगीत संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या सहाव्या सत्रात संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध प्रकारच्या संगीत वाद्यांचे धडे दिले.
पिंपरी : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे दोन दिवसीय संगीत संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या सहाव्या सत्रात संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध प्रकारच्या संगीत वाद्यांचे धडे दिले. यामध्ये जलतरंग, तबला, सतार, सनई, सुंद्री, व्हायोलिन यांसारख्या वाद्यांची माहिती दिली.
जलतरंग या वाद्याविषयी बोलताना पंडित मिलिंद तुळणकर म्हणाले, जलतरंग हे खूप जुने वाद्य आहे. यासाठी विशिष्ट प्रकारची भांडी निवडावी लागतात. यात वापरले जाणारे पाणीही चांगल्या प्रतीचेच लागते. बाऊलचा आकार जसा लहान होत जाईल तसा मंद्र सप्तकाचा अनुभव येतो. या वाद्याचा आनंद मुलांच्या विश्वाशी जोडण्यासाठी ‘लकडी की काठी, असावा सुंदर, दिल हैं छोटासा’ ही गाणी प्रत्यक्ष वाजवून दाखवली. राग गुजरी तोडी वाजवताना तबलावादक गणेश तानवडे यांच्या सोबतच्या जुगलबंदीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
सतारवाद्याविषयी माहिती देताना पं. सहाना बॅनर्जी म्हणाल्या, ‘सतार हे भारतीय वाद्यांतील मुख्य वाद्यांपैकी एक मानले जाते. मुघल काळातील पं. आमित खुसरॉ यांनी वीणा वाद्यात काही बदल करून सतार वाद्याची निर्मिती केली. पुढे त्यात काळानुरूप बदल होत गेले. घराणे पद्धतीविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, ही संगीताची शिक्षण पद्धती आहे. यावरून संगीत सादरीकरण बदलत जाते. त्यानंतर त्यांनी ‘राग सारंग, एक तराना बंदिश आणि रघुपती राघव राजा राम’ ह्या भजनावर अतिशय तरल सतार वादन प्रस्तुत करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना विवेक भालेराव यांनी तबला संगत केली.
पखवाज हे मृदंगाचे नवे रूप म्हणता येईल. स्वाती मुनींनी या वाद्याची निर्मिती केली असे म्हणतात, असे सांगत ज्ञानेश्वर देशमुख यांनी ताल चौताल उमेश पुरोहित यांच्या संवादिनी साथीने सादर केला.
डॉ. प्रमोद गायकवाड यांनी सुंद्री व सनई ही वाद्ये सुशील वाद्य प्रकारात येत असून, अतिशय दुर्मिळ पारंपरिक वाद्यांपैकी मानली जातात असे सांगितले. याचा अनुभव घाशीराम कोतवाल या नाटकातील एक पद व राग सारंग वाजवून दिला. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. विकास कशाळकर यांनी केले. तर प्रस्तावना मधुरा लुंकड यांनी केली.