गळक्या छताखाली विद्यार्थी गिरवतात शिक्षणाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 02:48 PM2019-07-10T14:48:34+5:302019-07-10T14:51:20+5:30
अनेक शाळांमध्ये घाणीचे साम्राज्य, पावसामुळे गळके छत, भिंतींना भेगा अन् अपुरी बाक संख्या असल्याने जमिनीवर बसून धडे गिरवणारे विद्यार्थी, असे विदारक चित्र ‘लोकमत’ पाहणीमध्ये दिसून आले.
शीतल मुंडे -
पिंपरी : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या काही शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे वाकड, पिंपळे गुरव, थेरगाव, रहाटणी, पिंपळे सौदागर व कासारवाडी या भागांतील अनेक शाळांमध्ये घाणीचे साम्राज्य, पावसामुळे गळके छत, भिंतींना भेगा अन् अपुरी बाक संख्या असल्याने जमिनीवर बसून धडे गिरवणारे विद्यार्थी, असे विदारक चित्र ‘लोकमत’ पाहणीमध्ये दिसून आले.
पुण्यातील कोंढवा व आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक कामगार व मजुरांचा नाहक बळी गेला. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारतींची ‘लोकमत’ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी येथील असुविधा व समस्यांचा पाढा वाचून दाखविला.
एका बाजूला महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याचा गाजावाजा करीत राजकीय वजन असलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रभागात ई-लर्निंगचा उपक्रम राबवित आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला शहरातील अनेक भागांत महापालिकेच्या शाळेत शिक्षणाचे धडे घेण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
काळेवाडी, रहाटणी, थेरगाव व वाकड येथील अनेक शाळांमध्ये किमान मूलभूत सुविधाही विद्यार्थ्यांना नाहीत. शाळांच्या भिंतींना भेगा अन् त्यामधून पाणी झिरपत असल्याने त्यावर शेवाळे आले आहे.
स्थानिक नगरसेवकांचे लक्ष असलेल्या मोजक्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सुविधा आहे. मात्र, उर्वरित अनेक शाळांमध्ये फायबरच्या टाकीमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आलेले आहे. या टाक्या नियमितपणे स्वच्छ केल्या जात असल्याने शेवाळ साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. काही शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असूनही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याविषयी शाळांनी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करूनही त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
शाळांमध्ये शिक्षकांची वानवा
शहरातील काही शाळेंची पटसंख्या अतिशय चांगली आहे. मात्र त्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. यामुळे तासिका तत्त्वावरील शिक्षकांवर याचा भार येत आहे. शाळेच्या प्रमुख्यांनी वेळोवेळी शिक्षकांची मागणी केली. मात्र त्यांना शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले नाही. यामुळे एका वर्गामध्ये ७५ ते ८० विद्यार्थी एकाच वेळी शिक्षण घेताना दिसत आहेत.
........
* शाळांची सुरक्षा रामभरोसे
महापालिकेने प्रत्येक शाळेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. प्रत्यक्षात बहुतांश शाळांमध्ये पाहणी केली असता, सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळून आले़ तर काही सुरक्षारक्षक गणवेशामध्ये नसल्याने शाळांचा सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र दिसले.
.........
* शाळांभोवती कचरा
शहरातील काही शाळांमधील वर्गखोल्या गळतात. त्याच गळक्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. आजूबाजूच्या परिसरात कचरा साचला आहे. मात्र, शाळेच्या हद्दीबाहेर असल्याने तो उचलला जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अशा अस्वच्छ परिसरात विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत.
.........
* संगणक धूळ खात
महापालिकेच्या शाळांमध्ये महापालिकेतर्फे संगणक उपलब्ध करून देण्यात आले. मात्र शाळांमध्ये प्रशिक्षण देणारे शिक्षक नसल्याने संगणक धूळ खात पडलेले आहेत. पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरातील शाळांमध्ये संगणक कक्षामध्ये पाणीगळती होत आहे.
.......
* फाटके गणवेश
महापालिकेतील ठेकेदार, पदाधिकारी व प्रशासनाच्या वादामुळे यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. त्यामुळे जुने व फाटलेले गणवेशासह विद्यार्थी शाळेत येत असल्याचे चित्र बºयाच शाळांमध्ये दिसून आले.