शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये; पिंपरी महापालिका सज्ज, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात
By विश्वास मोरे | Updated: June 9, 2024 18:40 IST2024-06-09T18:39:05+5:302024-06-09T18:40:37+5:30
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक २४ तास सुरु ठेवावावेत आणि घटनास्थळी तातडीने दाखल होऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, आयुक्तांच्या सूचना

संग्रहित छायाचित्र
पिंपरी : मान्सूनचे आगमन झाले आहे. या काळात रात्रीच्या वेळी शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले आहे. 'मान्सून काळात कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक २४ तास सुरु ठेवावावेत आणि घटनास्थळी तातडीने दाखल होऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत. महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पर पडली, त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन आराखडा
पिंपरी चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या वाहतात. या नद्यांच्या तीरावर मोठ्यासंख्यने नागरिक वास्तव्यास आहेत. नद्यांच्या उगमाकडील भागात अतिवृष्टी झाल्यास शहरातील नदी तटावरील घरांमध्ये पाणी शिरण्याच्या शक्यता निर्माण होतात. तसेच जास्त पावसामुळे शहरात गटार, रस्ते, नाला अशा ठिकाणी पाणी तुंबणे, पाणी घरात शिरणे, घराची पडझड होणे, वादळ वा-यामुळे झाडे पडणे अशा दुर्घटना घडू शकतात. या दुर्घटनांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. क्षेत्रीय कार्यालायनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये स्थापत्य विभागाचे कनिष्ट अभियंता, जलनिस्सारण विभागाचे कनिष्ट अभियंता, आरोग्य निरीक्षक, सफाई कामगार आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.