मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मावळातील विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:57 PM2023-02-28T12:57:30+5:302023-02-28T12:59:21+5:30
५० विद्यार्थ्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लिहले पत्र...
पिंपरी :मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीने जोर धरल्यानंतर काही वर्षांपूर्वी तशा स्वरूपाचा प्रस्ताव दिल्ली दरबारी म्हणजे केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. मात्र, सुमारे अडीच हजार वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे सोमवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मावळ तालुक्यातील कोंडवडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ५० विद्यार्थ्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साकडे घातले आहे.
कोंडिवडे येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांना विनंती करणारे पत्र लिहिले आहे. या मुलांनी त्यांचे नाव, पत्ता, शिक्षण अशी सर्व माहिती नमूद करीत आमच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी विनंती पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. ही पत्रे प्रधानमंत्री कार्यालय, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्यात आली आहेत.
कोंडीवडे शाळेत सोमवारी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आदर्श शिक्षिका शिल्पा बडगुजर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तानाजी भोसले यांनी मार्गदर्शन केले.
काय आहे पत्रातील मजकूर...
मी रिया शिवाजी तळवडे, कोंडवडे येथील शाळेत पाचवीमध्ये मराठी भाषेतून शिक्षण घेत आहे. आमची मराठी भाषा खूप प्राचीन व सुंदर भाषा आहे. आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही विनंती. तुमची लाडकी रिया.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मंत्रिमंडळ पातळीवर विचाराधीन आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे उत्तर केंद्राने दिलेले आहे. त्यामुळे मराठीला कधीपर्यंत अभिजातचा दर्जा मिळेल, हे चित्र अजूनही अस्पष्टच आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारकडून अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आतापर्यंत संस्कृत, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. पण, अजूनही मराठी भाषा प्रतीक्षेत आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली ही पत्रे पोस्टाद्वारे पाठविण्यात आली आहेत.
- तानाजी भोसले, मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक, शाळा कोंडविडे