टोळ्यांचे म्होरके संपले, सदस्य सक्रियच, स्थानिक गुंडांकडून दहशतीसाठी वाहनांची तोडफोड, दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:15 AM2017-11-22T01:15:48+5:302017-11-22T01:16:03+5:30
पिंपरी : खंडणी आणि हप्तेवसुली करणा-या महाकाली टोळीचा प्रमुख महाकाली ऊर्फ राकेश फुलचंद ढकोलिया याचा २०११ ला पोलिसांनी एन्काउंटर केला.
पिंपरी : खंडणी आणि हप्तेवसुली करणा-या महाकाली टोळीचा प्रमुख महाकाली ऊर्फ राकेश फुलचंद ढकोलिया याचा २०११ ला पोलिसांनी एन्काउंटर केला. दहशत माजविणारी महाकाली टोळी संपुष्टात आली. मात्र, महाकाली टोळीत त्या वेळी सक्रिय असलेल्या काही गुंडांनी रावण साम्राज्य नावाची टोळी तयार केली.
महाकालीनंतर नव्याने स्थापन झालेल्या रावण टोळीच्या माध्यमातून गुंडगिरीत वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणाºया अनिकेत राजू जाधव याचा सोन्या काळभोर आणि महाकाली टोळीचा वारसा चालविणाºया काही गुंडांनी आकुर्डीत सोमवारी रात्री निर्घृण खून केला. स्थानिक टोळीच्या म्होरक्यांचा अंत झाला, तरीही टोळ्या मात्र सक्रियच राहत असल्याने पोलिसांसाठी ही डोकेदुखी ठरू लागली आहे.
महाकालीच्या काळात दुकानदार, व्यापारी यांच्याकडून हप्तेवसुली, खंडणी गोळा करण्याचे प्रकार घडत होते. हातात नंग्या तलवारी घेऊन, वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक अशा प्रकारे दहशत माजवली जात होती. २००० मध्ये राकेश ढकोलिया याने स्थापन केलेल्या या टोळीने २०११पर्यंत पोलिसांना जेरीस आणले. पोलिसांना गुंगारा देऊन २००८ मध्ये महाकाली हातातील बेड्यांसह पसार झाला होता.
>वर्चस्वासाठी एकमेकांवर हल्ले
रावण साम्राज्य टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याच्या खून प्रकरणात आकुर्डीतील सोन्या काळभोर याच्यासह अक्षय काळभोर, दत्ता काळभोर (समर्थनगर, निगडी), हनुमंत शिंदे, जीवन सातपुते, बाबा ऊर्फ अमित फ्रान्सिस (भोसरी) या आरोपींविरोधात निगडी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून रावण टोळीच्या अनिकेतचा खून झाला. महाकालीच्या एन्काउंटरनंतर त्या टोळीचा सूत्रधार बनलेल्या हणम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न अनिकेतने केला होता.
महिनाभरापूर्वी आकुर्डीच्या रमाबाई वसाहतीमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर अनिकेत फरार झाला होता. तरी टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने त्यांच्यात होणाºया हल्ल्याच्या घटनांमुळे त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. याच पूर्ववैमनस्यातून अनिकेतचा खून झाला आहे. टोळीप्रमुख मारले गेले, तरी शहरात स्थानिक गुंडांच्या टोळ्या सक्रिय आहेत.
>ग्रुपच्या बनतात टोळ्या
झोपडपट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने मुलांचे ग्रुप तयार होत आहेत. हे ग्रुप भाईगिरीत सक्रिय असून, कोणत्या ना कोणत्या गुंडांशी संलग्न आहेत. एखाद्या गुंडाचा वाढदिवस असेल, तर शुभेच्छाफलकांवर ठिकठिकाणी या ग्रुपमधील अल्पवयीन मुलांचे फोटो झळकताना दिसून येतात. राडा बॉइज, अण्णा, आप्पा, वायबी, भवानी, डब्ल्यू बॉइज असे ग्रुप स्थापन झाले आहेत. त्यांना गुंडगिरीचे बाळकडू या ग्रुपच्या माध्यमातूनच मिळते.