जीवनशैली निर्देशांक तपासणीची सूचना, पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:21 AM2018-03-23T05:21:14+5:302018-03-23T05:26:48+5:30
स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील जीवनशैली निर्देशांक तपासण्यात येणार असून, राज्य शासनाने महापालिकांपैकी १८ शहरांची निवड केली असून, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
पिंपरी : स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील जीवनशैली निर्देशांक तपासण्यात येणार असून, राज्य शासनाने महापालिकांपैकी १८ शहरांची निवड केली असून, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जीवनशैली निर्देशांक उपक्रमासाठी देशातील ११६ शहरांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्रातील १८ शहरे आहेत. उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी मागील महिन्यात केंद्र शासनाने नवी दिल्ली येथे
कार्यशाळा घेतली होती. त्यात महापालिकेचे सह शहर अभियंता राजन पाटील सहभागी झाले होते. जीवनशैली निर्देशांक उपक्रमात नोडल अधिकारी म्हणून राजन पाटील यांची निवड झाली आहे.
सह शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, ‘‘निवड झालेली शहरे दहा लाख लोकसंख्येच्या पुढील आहेत. त्याद्वारे त्या शहरांची जीवनशैली कशी आहे, हे स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेसाठी निर्देशांक विचारात घेतले जाणार आहेत.
- जीवनशैली निर्देशांकाची तपासणी करण्यासाठी विविध खात्यांतील अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येणार आहे. त्यात शिक्षण पद्धती, गुन्हेगारीचा आलेख कसा, करमणुकीची साधने कोणती, किती लोक इंटरनेट वापरतात, याचे सर्वेक्षण होणार आहे. वीज कंपनी, सिंचन, प्रदूषण महामंडळ, परिवहन, राज्य विक्रीकर विभाग, बांधकाम खाते, अन्न व औषध प्रशासन यांच्याकडूनही माहिती मागविली जाणार आहे. त्यातून शहराचे मानांकन निश्चित होणार आहे, असे राजन पाटील यांनी सांगितले.