एकगठ्ठा संपर्कासाठी लग्नसोहळ्यांना हजेरी
By admin | Published: February 12, 2017 05:12 AM2017-02-12T05:12:20+5:302017-02-12T05:12:20+5:30
मावळ तालुक्यात जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून, प्रचारकार्याला भन्नाट गती येऊ लागली आहे. अपक्ष आणि सर्वच पक्षांचे
कामशेत : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून, प्रचारकार्याला भन्नाट गती येऊ लागली आहे. अपक्ष आणि सर्वच पक्षांचे उमेदवार सर्वव्यापी प्रचारास प्राधान्य देत आहेत. लग्नसोहळ्यास हजेरी लावून एकगठ्ठा पद्धतीने मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न बहुतेक उमेदवार करत आहेत. दशक्रिया विधी व इतर कार्यक्रमांनाही न चुकता ते जात आहेत.
निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, सर्वच पक्षांचे अधिकृत उमेदवार जाहीर झाले आहेत. बंडखोरांनीही कंबर कसली आहे. उमेदवारीअर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, माघारीसाठी मुदत असली, तरी सर्वच उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. बहुतेक उमेदवारांनी पक्षाकडून तिकीट मिळण्याआधीच सुरुवात केली होती. सध्या उमेदवार प्रचारकार्यात अतिव्यस्त असून, कार्यकर्त्यांची जमवाजमव करून प्रत्येकाच्या खांद्यावर प्रचाराची जबाबदारी दिली जात आहे.
विश्वासातील माणसांची निवड करून त्यांच्याद्वारे कार्यकर्त्यांना विविध सूचना दिल्या जात आहेत. प्रचारासाठी रोजच्या दैनंदिन कार्यक्रमाची आखणी केली जात असून, कार्यकर्त्यांना भाड्याने घेतलेली वाहने देऊन, तसेच भेळभत्ता देऊन सकाळीच प्रचारासाठी पिटाळले जात आहे. अनेक मातबर उमेदवारांनी आपली वाहने प्रचारासाठी पक्षाच्या झेंड्यामधील रंगाने व पोस्टरने विशिष्ट पद्धतीने रंगवली आहेत. ती वाहने नागरिकांच्या कौतुकाचा विषय होत आहेत. प्रचारदौरा, मतदारांच्या गाठीभेटी यावर सध्यातरी जास्त भर दिला जात असून, नातेवाईक, सगेसोयरे, भावकी, मित्र मंडळी, तसेच कार्यकर्त्यांच्या नातेसंबंधातील मतदारांना भेटण्याकडे उमेदवारांचा कल वाढला आहे. (वार्ताहर)
सर्वपक्षीय उमेदवारांची हजेरी
लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने लग्नकार्याला उमेदवारांकडून आवर्जून हजेरी लावली जात आहे. आपल्या भागातील मतदाराच्या घरातील लग्नात सर्वपक्षीय उमेदवार, तसेच अपक्ष उमेदवार हजेरी लावत असल्याने वधू-वर मंडळींची मोठी गोची होत आहे. लग्नकार्यात एकाच व्यासपीठावर प्रथम कोणाचा सत्कार करायचा हा प्रश्न त्यांना पडत आहे. सत्कार विरोधी उमेदवारानंतर केला, तरी चेहऱ्यावरील नाराजी उमेदवार दाखवत नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. लग्नकार्यात एकाच वेळी अनेकांना भेटता येते. त्याचप्रमाणे भाषण करता येते. दशक्रिया विधी व इतर कार्यक्रमांनाही आवर्जून हजेरी लावली जात आहे.