जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:04 AM2017-08-04T03:04:46+5:302017-08-04T03:06:32+5:30
जलवाहिनी फुटल्याने चिंचवड येथे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास लोकमान्य रूग्णालयाजवळ घडली.
पिंपरी : जलवाहिनी फुटल्याने चिंचवड येथे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास लोकमान्य रूग्णालयाजवळ घडली. लाखो लिटर पाणी वाया गेले, याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणी साठा शंभर टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे दिवसाआड सुरू असणारा पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. नियमितपणे पाणीपुरठा होत असला, तरी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तसेच शहरातील अंतर्गत वाहिन्या खराब झाल्याने त्या फुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. चिंचवड स्टेशनकडून चिंचवडगावाकडे जाणाºया रस्त्यावर महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. येथील जलवाहिनी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास फुटली. त्यामुळे सुमारे पंधरा फूट उंच पाण्याचे कारंजे उडत होते. लाखो लिटर पाणी वाया जात होते. या वेळी येथील रस्ता खोलगट भागातील असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाणी वाहून जात होते. दरम्यान, येथील दृष्य मोबाइलमध्ये टिपण्यासाठी तरूणांचीही लगबग सुरू होती. तर काहींनी याबाबतची माहिती महापालिका प्रशासनास देण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाऊण तासात लाखो लिटर पाणी वाया गेले.