‘आरटीओ’चा दिव्याखाली अंधार
By admin | Published: June 4, 2016 12:23 AM2016-06-04T00:23:35+5:302016-06-04T00:23:35+5:30
वाहन परवाना काढताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहतुकीच्या सर्व नियमांची उजळणी संबंधितांकडून करवून घेतली जाते
पिंपरी : वाहन परवाना काढताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहतुकीच्या सर्व नियमांची उजळणी संबंधितांकडून करवून घेतली जाते. नियमपालन, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याची कशी काळजी घ्यावी याबाबत चाचणी घेतली जाते. मात्र, परवान्यासाठी सर्व चालकांची परीक्षा घेणारे आरटीओच नियम धाब्यावर बसवीत आहे. संबंधितांना या कार्यालयात जाण्यासाठी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे आरटीओच्या दिव्याखाली अंधार असल्याची परिस्थिती आहे.
रस्त्यावरच दुचाकी-चारचाकी वाहने उभी करून थाटलेली दलालांची दुकाने, झेरॉक्स, पानटपऱ्या, थंड पेयांची दुकाने या सर्वांनी आरटीओला विळखा घातला आहे. आरटीओ त्यामध्ये हरवले आहे. ते शोधण्याची वेळ कार्यालयात पहिल्यांदाच येणाऱ्यांवर येते. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना येथे नाइलाजास्तव दलालांचे शिकार व्हावे लागत आहे.
चिखली येथे आरटीओची इमारत आहे. त्यातील पहिल्या मजल्यावर भाडेतत्त्वावर आरटीओ आहे. इमारतीपासून २०० फूट अंतरावरच दलालांची दुकाने सुरू होतात. पूर्णानगरला जाणाऱ्या रस्त्यालगतच्या चौकातच काही दलालांनी टपऱ्या टाकल्या आहेत. याच्या बाजूला उसाचे गुऱ्हाळ, चहा-नाष्ट्याच्या हातगाड्या, थंडपेय विक्रेते यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण केले आहे. या टपऱ्या कायमस्वरूपी अवस्थेत आहेत. टपऱ्यांच्या पुढे काही दलाल दुचाकीवर सुटकेस घेऊन दुकानदारी करतात. त्यांच्याकडे आलेले ग्राहक त्यांच्या दुचाकीसमोरच वाहने उभी करतात. इमारतीच्या प्रवेशद्वारावर ‘उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड’ अशा नावाची कमान आहे. त्या कमानीबाहेरही अनेक दुचाकी जागा मिळेल तशा उभ्या केल्या जातात. पुढच्या बाजूला रस्त्यावरच अनेकांनी पाकीट, की-चेन, चहा अशी दुकाने थाटली आहेत.
काही बहाद्दरांनी झेरॉक्स मशिन वाहनातच बसवून त्याला दुकानाचे स्वरूप दिले आहे. चहा-नाष्ट्याच्या गाड्याही याच पद्धतीत उभ्या असतात. या दुकानदारांच्या गाड्यांसमोर आरटीओत आलेल्या व्यक्तीने वाहन उभे केल्यास त्यांच्यात वाद
निर्माण होतात. रस्त्यावर अतिक्रमण केलेले हे दुकानदार नागरिकांशी
असे भांडतात, जसे काही त्यांनी ती जागाच खरेदी केली आहे. या अतिक्रमणामुळे आरटीओत प्रवेश करणे अवघड झाले आहे. (प्रतिनिधी)