विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; पिंपरी-चिंचवडला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
By विश्वास मोरे | Published: May 29, 2023 06:26 PM2023-05-29T18:26:21+5:302023-05-29T18:27:06+5:30
सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरीवर हजेरी लावली
पिंपरी: सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटात पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हजेरी लावली. शहरवासीयांना झोडपून काढले.
गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात बदल झालेला असून उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे उकाडा जाणवत होता. आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी बारानंतर आकाशामध्ये ढग घ्यायला सुरुवात झाली आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरीवर हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरवासींना झोडपून काढले. सोसाट्याच्या वारा आणि विजांचा कडकडाट सुरू होता.
तारांबळ उडाली
शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, थेरगाव, पुनावळे, किवळे, चिंचवड वाल्हेकरवाडी, चिंचवडस्टेशन, संत तुकारामनगर, नेहरूनगर, संभाजीनगर, चिखली, मोशी, भोसरी रावेत अशा विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती.
झाडांच्या फांद्या पडल्या
शहर परिसरामध्ये सायंकाळी सव्वा पाच वाजल्यापासून तर सातवाजेपर्यंत विविध भागांमध्ये पाऊस पडत होता. सहाच्या सुमारास पिंपरी परिसरामध्ये जोरदार पाऊस आला. तसेच वाऱ्यामुळे अनेक भागातील झाडांच्या फांद्या पडल्या कोसळल्या.
चिंचवड परिसरातील वीजपुरवठा खंडित
जोरदार पाऊस आणि जोरदार वारा येत असल्याने चिंचवड परिसरातील वीजपुरवठा सायंकाळी सातच्या सुमारास खंडित झाला होता. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.