उद्योगनगरीच्या विकासासाठी दुवा
By admin | Published: July 4, 2017 03:42 AM2017-07-04T03:42:23+5:302017-07-04T03:42:23+5:30
येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात रमजान ईदनिमित्त सर्वधर्मीयांकडून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनी उद्योगनगरीतील
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात रमजान ईदनिमित्त सर्वधर्मीयांकडून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनी उद्योगनगरीतील शांतता, सलोखा, समृद्धी आणि विकासासाठी दुवा मागितली. ‘रमजान हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मागितलेली दुवा मान्य होते. या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाहचा आशीर्वाद प्राप्त होतो. देशाच्या प्रगतीसाठी, तसेच सर्वांच्या कल्याणासाठी मुस्लिम बांधवांनी शिक्षणात प्रगती केली पाहिजे. उद्योगनगरीच्या सर्वांगीण विकासाची दुवा मागण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात जश्न-ए-ईद-मिलनचा दिमाखदार कार्यक्रम झाला. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी महापौर आझम पानसरे, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते. भाईजान काझी यांनी संयोजन केले. या वेळी सुलतान नाझॉं कव्वाल यांच्या कव्वालीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सामिष भोजनासह शिरखुर्म्याचा बेतही आखला होता.
या वेळी संयोजक भाईजान काझी म्हणाले, ‘‘पुण्यात सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याची ताकद असलेला लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता पिंपरी-चिंचवडमधील विविध विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत. शहरातील पायाभूत सोयी-सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांची जाण असलेला नेता लाभला आहे.’’
पालकमंत्री बापट म्हणाले, ‘‘रमजान हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मागितलेली ‘दुवा’ मान्य होते. या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाहचा आशीर्वाद प्राप्त होतो. देशाच्या प्रगतीसाठी, तसेच सर्वांच्या कल्याणासाठी मुस्लिम बांधवांनी शिक्षणात प्रगती केली पाहिजे. जाती-धर्माच्या अगोदर आपण माणूस आहोत, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आपल्या सर्वांनी केलेली ‘दुवा’ कबूल होऊन देशाची उत्तमोत्तम प्रगती होत राहील.