घराजवळ पुरली हातभट्टीची गावठी दारू: सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 09:51 PM2021-06-05T21:51:24+5:302021-06-05T21:52:00+5:30
हिंजवडी परिसरात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : पोलिसांपासून बचावासाठी अवैध धंद्यावाले अनेक शक्कल लढवतात. अशाच प्रकारे एका महिलेने गावठी हातभट्टीची दारू तयार करून कॅनमध्ये भरून घरामागच्या मोकळ्या जागेत पुरायची. त्या दारूची वाहतूक करून आसपासच्या परिसरात विक्री करायची. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने या दारुभट्टीवर छापा मारत हा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवईत तीन लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरे दत्तवाडी रोडलगत असलेल्या शिवांजली नगर, हिंजवडी येथे एक महिला ही गावठी हातभट्टीची दारू तयार करून ती दारू प्लास्टिक कॅनमध्ये भरून ते कॅन तिच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या मैदानात पुरत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि. ४) दुपारी सव्वाएकच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. दोन लाख ८० हजारांची टाकी, त्यात साडेतीन हजार गावठी दारू बनविण्याचे रसायन, एक हजारांची लोखंडी टाकी, ५०० रुपयांची मोकळी टाकी, २०० रुपयांचा एक पाईप, ७० हजार रुपये किमतीची ७०० लिटर गावठी हातभट्टीची दारू, असा एकूण तीन लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला.
आरोपी महिला ही गावठी हातभट्टीची दारू तयार करून प्लास्टिक कॅनमध्ये भरून साठवत होती. दारूचे ते कॅन तिच्या राहत्या घरामागील मोकळ्या जागेत पुरायची. तसेच तिला शक्य होईल तेव्हा वाहतूक करून आजबाजूच्या परिसरात ती दारू विक्री करायची. पोलिसांनी कारवाई करून दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले. तसेच जमिनीत पुरलेले दारूचे कॅन उकरून काढून जप्त केले.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, संतोष बर्गे, भगवंता मुठे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.