सत्याला स्पर्शणारे साहित्य चिरंतन
By admin | Published: December 7, 2015 12:00 AM2015-12-07T00:00:28+5:302015-12-07T00:00:28+5:30
‘जिवंत माणसाची वेदना मांडण्याचे कसब लेखनाला जिवंतपणा बहाल करते, तसेच मानवी मनाला ज्ञानाचा, सत्याचा स्पर्श करणारे साहित्य चिरंतन असते,’
पिंपरी : ‘जिवंत माणसाची वेदना मांडण्याचे कसब लेखनाला जिवंतपणा बहाल करते, तसेच मानवी मनाला ज्ञानाचा, सत्याचा स्पर्श करणारे साहित्य चिरंतन असते,’
असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
एसकेएफ हॉल (चिंचवड) येथे शनिवारी बी.एम. देशमुखलिखित ‘असा वाहतो पाट’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ, मुंबईचे अध्यक्ष डॉ. प्रा. सोमनाथ रोडे अध्यक्षस्थानी होते. व्याख्याते राजेंद्र घावटे, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी जगताप, साहित्य संवर्धन समिती अध्यक्ष सुरेश कंक, सुरेश देशपांडे, डॉ. हंसराज बाहेती, लक्ष्मण उमराणी, धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे, शिवाजी चाळक, मधू जोशी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘संस्कृतीतील विकृतीच्या जागा देशमुखांसारख्या संवेदनशील लेखकाला आव्हान देत असतात. मनाच्या तळाचा शोध घेणारी भाषाशैली हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.’’ प्रारंभी देशमुख यांनी मनोगतात सांगितले की, कलात्मक मूल्यांपेक्षा जाणिवेची मूल्ये मला जास्त महत्त्वाची वाटतात. घावटे यांनी साहित्य हे परिवर्तनवादी असायला हवे, असे मत मांडले. डॉ. प्रा. रोडे म्हणाले, ‘‘केवळ घोषणांनी क्रांती होत नाही, तर ती फक्त बलिदानातूनच होते. मनाची अस्वस्थता आणि बेचैनीतून जगण्याचे तत्त्व सापडते.’’
मनोज देशमुख, सविता इंगळे, शैलजा देशमुख, वर्षा बालगोपाल यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप गांधलीकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)