तीन सर्पांना जीवदान
By admin | Published: November 17, 2016 03:01 AM2016-11-17T03:01:26+5:302016-11-17T03:01:26+5:30
नाणोली स्टड फार्ममधील टाकीमध्ये पडलेल्या नाग आणि दोन दिवड या सर्पांना सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडून दिले.
करंजगाव : नाणोली स्टड फार्ममधील टाकीमध्ये पडलेल्या नाग आणि दोन दिवड या सर्पांना सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडून दिले.
स्टड फार्ममधील कर्मचारी दत्तू वाघुले हे काही कामानिमित्त टाकीजवळ गेले असता त्यांना हे सर्प आढळले. त्यांनी सर्पमित्र दक्ष काटकर यांना बोलावून घेतले. दक्ष यांनी टाकीत उतरून प्रथम नागास आणि नंतर दिवडला सुरक्षितरीत्या पकडले. नागास फार्मपासून दूर असलेल्या डोंगरात सोडून दिले आणि दिवड या सापास इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात आले. फार्मचे व्यवस्थापक रवी रेड्डी, जगजितसिंग नाथावत आणि स्वित्झर्लंडचे सर्पप्रेमी बर्णाड दुवेर्णाय उपस्थित होते. दिवड हे साप पाण्यात राहणारे आहेत. टाकी खूप मोठी असल्याने, तसेच टाकीतील पाण्याची पातळी खूप कमी असल्याने त्यांना टाकीबाहेर निघणे खूप अवघड झाले होते. नाग हा सर्प उत्तरपूर्व सोडून भारतात सर्वत्र आढळतो. नागाला भारतीय कायद्याचे संरक्षण आहे. अंधश्रद्धेमुळे नागास मारले जाते. ग्रामीण भागात बरेचशे सर्पदंश हे नागाचे असतात आणि ग्रामीण भागातील दवाखान्यात सर्पदंश झाल्यानंतर त्यावरील लस उपलब्ध नसते. त्यामुळे ग्रामीण भागात नागाचा दंश झाल्यानंतर अनेकदा इतर उपचार केले जातात. त्यात अनेकदा नागरिकांचा मृत्यू होतो. सर्पदंशानंतर नागरिकांनी सरकारी दवाखान्यात किंवा शहरातील दवाखान्यात उपचारासाठी जावे, असे आवाहन काटकर यांनी केले. (वार्ताहर)