खोलीत डांबून ठेवत आठ लाखांची मागितली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 02:36 PM2019-04-13T14:36:56+5:302019-04-13T14:38:33+5:30
आरोपी कामाच्या बहाण्याने फिर्यादीला सातारा, कराड, इस्लामपूर येथे घेवून गेला. तेथून पुन्हा येत असताना रस्त्यात एका ठिकाणी त्यांना खोलीत डांबून ठेवले.
पिंपरी : कामाच्या बहाण्याने एकाला मोटारीत बसवून नेले. मात्र, रस्त्यातच एका खोलीत डांबून ठेवत त्याच्या नातेवाईकाकडे आठ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद माली (रा. राजस्थान, पूर्ण पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भवरलाल हिरालाल चौधरी (वय ४७. रा. गल्ली नं. ४, खराडीरोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास त्रिवेणीनगर येथून आरोपी गोविंद हा फिर्यादी चौधरी यांना कामाच्या बहाण्याने सातारा, कराड, इस्लामपूर येथे घेवून गेला. तेथून पुन्हा येत असताना रस्त्यात एका ठिकाणी त्यांना खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर आरोपीने चौधरी यांचा मावस भाऊ दिनेश हेमाराम सिरवी व मामा श्रवणकुमार चौधरी यांच्या मोबाईलवर वेळोवेळी फोन केला. त्यांच्याकडे ८ लाख रुपयांची खंडणी मागत सुरेशला पकडून ठेवले आहे २ लाख रुपये दे तरच सोडतो, सुरेशला माझ्याकडे बसवून ठेवले आहे, पैसे न दिल्यास त्याचे हातपाय तोडून त्याला मारुन टाकेन, मी कोणालाच घाबरत नाही, अशी धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.