लाॅकडाऊन; डिझेलचा खप १०९ लाख टनांनी घटला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 01:31 AM2021-03-11T01:31:35+5:302021-03-11T01:31:44+5:30
पेट्रोलच्या खपामध्ये तूट : उद्योग-व्यवसायांचा गाडा अजूनही नाही रुळावर
विशाल शिर्के
पिंपरी : कोरोनामुळे (कोविड-१९) उद्योग आणि व्यवसायाची विस्कटलेली घडी अजूनही व्यवस्थित झाली नसल्याचे डिझेल खपाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत डिझेलचा खप गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १०.९ दशलक्ष टनांनी (१०९ लाख टन) घटला आहे. पेट्रोलचा खपही ३.५ दशलक्ष टनांनी घटला असल्याची माहिती समोर आली आहे.
पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च-२०२०च्या शेवटच्या सप्ताहात देशात टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक आणि जनजीवन ठप्प पडले. या काळात पेट्रोल-डिझेलचा खप नीचांकी पातळीवर आला.
जून २०२० नंतर देशासह राज्यात टाळेबंदीचे नियम हळूहळू शिथिल करण्यात आले. त्यानंतर उद्योगांचा गाडा हळूहळू रुळावर येऊ लागला. उद्योगांसाठी, माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी देशात डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनॅलिसिस सेलने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१९-२०च्या तुलनेत एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांतील डिझेलचा खप १०९ लाख टनांनी घटला आहे. जानेवारी-२०२० च्या तुलनेत जानेवारी-२०२०१ मधील डिझेलचा खप २ लाख टनांनी कमी आहे. अजूनही इंधनाची मागणी पूर्वपदावर आलेली नाही.
पेट्रोलच्या खप २०१९-२० च्या तुलनेत एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत ३५ लाख टनांनी घटला आहे. जानेवारी-२०२० च्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये पेट्रोलच्या मागणीत १ लाख टनांनी वाढ झाली. म्हणजे पेट्रोलची मागणी वाढली आहे. जनजीवन पूर्वपदावर आल्याने खासगी वाहनांकडून मागणी वाढल्याने ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
डिझेलची मागणी अजून ७० टक्क्यांवर देखील आली नाही. लांब पल्ल्याची माल वाहतूक करणारे ट्रक कमी असल्याने डिझेलचा खप कमी झाला आहे.
- अली दारुवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, पेट्रोल अँड डीलर्स असोसिएशन
एप्रिल ते जानेवारी देशातील इंधन खप
इंधन प्रकार २०१९-२० २०२०-२१
पेट्रोल २५.३ २२.८
डिझेल ६९.८ ५८.९
जानेवारी महिन्यातील इंधनाचा खप
इंधन प्रकार २०२० २०२१
पेट्रोल २.५ २.६
डिझेल ७.० ६.८