लॉकडाऊनचे नियम शिथील झाले, आता कोरोना वाढणार, सतर्कता बाळगा: श्रावण हर्डीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 11:33 PM2020-06-05T23:33:38+5:302020-06-05T23:33:56+5:30
लॉकडाउन शिथिल केल्यापासून रुग्णवाढ सुरू झाली आहे.
पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड हे शहर कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत रुग्णसंख्येची वाढ मर्यादित होती. आता लॉकडाऊन उठला आहे. नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. झोपडपट्ट्या, गावठाण आणि दाट लोकवस्तीच्या भागात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या बारा दिवस लागत आहेत. त्यानुसार महिनाअखेरपर्यंत अडीच ते तीन हजार रुग्ण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
गावठाण भागात कोरोना वाढतोय
पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. आयुक्त हर्डीकर यांनी शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. आयुक्त म्हणाले, आपण कोरोनातून बाहेर पडलो असल्याचे मनातून काढून टाकावे. शहरात सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा कमी प्रादुर्भाव झाला. लॉकडाउन शिथिल केल्यापासून रुग्णवाढ सुरू झाली आहे. झोपडपट्ट्या, गावठाण भागात रुग्ण वाढताना दिसून येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू केले जात आहेत. त्यांच्या हाय रिस्क कॉन्टक्टमधील रुग्णांची आवश्यकेनुसार तपासणी केली जाते. होम क्वारंटाइन केले जाते. तर, होम क्वारंटाइन शक्य नसणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाइन केले जाते. नागरिक क्वारंटाइन होण्यास नकार देतात.