लोकसभा निवडणूक 2024: 13 मे या तारखेला विरोधकांचे बारा वाजणार; एकनाथ शिंदे यांचा घणाघात
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 11, 2024 07:16 PM2024-05-11T19:16:58+5:302024-05-11T19:18:16+5:30
श्रीरंग बारणे यांचा रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन
ज्ञानेश्वर भंडारे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. त्याचबरोबर मावळमधूनही श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा खासदार होणार आहेत. त्यामुळे तेरा तारखेला विरोधकांचे बारा वाजणार आहेत, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.११) रोड-शो करत प्रचार केला. शहरातील चाफेकर चौकातून या रॅलीची सुरुवात झाली. साडेतीन ते चार तास ही रॅली चालली. सकाळी नऊ वाजता सुरू होणारी रॅली दुपारी बारा वाजता सुरू झाली. यावेळी आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, आण्णा बनसोडे आदी उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात तिन्ही टप्प्यामध्ये महायुती सर्वात पुढे असून ४५ पार जागांवर जिंकणार आहेत. महिलांनी १३ तारखेला मतदानामध्ये सहभागी व्हावे, त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींना मतदानासाठी पाठवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आणि विधान सभेत महिलांना आरक्षण दिले आहे. आगामी निवडणुकांमध्ये संसदेत आणि विधानसभेत महिला दिसतील, असंही शिंदे म्हणाले.
तर मावळला मंत्रिपद
शिंदे म्हणाले, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे हॅट्रिक नक्की करतील. बारणे यांना मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळते. अबकी बार आप्पा तिसरी बार खासदार अशी घोषणा देत मावळमध्ये ७५ ते ८० टक्के मतदान झाल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ, असे यावेळी शिंदे म्हणाले.