लोकमत इम्पॅक्ट : पिंपरी चिंचवड महापालिकेची सुरक्षा व्यवस्था होणार कडक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:13 PM2019-04-05T20:13:39+5:302019-04-05T20:14:13+5:30
महापालिका कार्यालयाच्या सुरक्षेबाबत लोकमतने स्टिंग ऑपरेशन केले होते.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक असते. सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टरमधून तपासणी करून नागरिकांना मनपाभवनात प्रवेश दिला जात असला आणि सीसीटीव्हीचा वॉच असला, तरी महापालिका भवनात आलेल्या व्यक्तीची माहिती उपलब्ध होत नसते. त्यामुळे महापालिकेची सुरक्षा कडक करण्याच्या दृष्टीने मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरी व्हिजिटर व्यवस्थापन सिस्टीम अद्ययावत करण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीत महापालिकेची चार मजली प्रशासकीय इमारत आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता यासह विविध विषय समिती सभापतींची दालने आहेत. या मुख्य प्रशासकीय इमारतीत शहरातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी, त्याचे निराकरण करण्यासाठी दररोज येत असतात. या नागरिकांची नोंद घेण्यासाठी हस्तलिखित गेट पास देण्यात येतो. सन २०१२ ते २०१६ या काळात गेट पास संगणकीय मशिनद्वारे दिला जात होता. मात्र, हा संगणक जुन्या मॉडेलचा असल्याने तो बंद पडला आहे. त्यामुळे पुन्हा हस्तलिखित गेट पास देण्यात येत आहे.
लोकमतच्या वृत्ताची दखल
महापालिका कार्यालयाच्या सुरक्षेबाबत लोकमतने स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यावरून महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळही झाला होता. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महापालिकेत कामांसाठी येणाऱ्यांची माहिती अद्ययावतपणे नोंदवून घेतल्यास व्हिजिटरची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. नवीन यंत्रणेद्वारे व्यक्तीची माहिती, छायाचित्र, कोणत्या कामासाठी आली आहे. ही माहिती नोंदविली जाणार आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन स्थायी समिती अध्यक्षांनी सुरक्षा यंत्रणा कडक करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
विलास मडिगेरी म्हणाले, महापालिका भवनात व्हिजिटर येत असतात. काही वर्षांपूर्वी व्हिजिटर पास हे संगणकाद्वारे देण्यात येत होते. मात्र, आता ही यंत्रणा तीन वर्षांपासून बंद पडली आहे. त्यामुळे सुरक्षा विभागाला व्हिजिटर पास व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक सिस्टीम सॉफ्टवेअरसह दोन संगणक संच सुरक्षा विभागास उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या यंत्रणेमध्ये व्हिजिटरच्या फोटोची सोय असावी, त्याचा डेटा भरण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती घेण्याची व्यवस्था असावी, विविध सोयी-सुविधादेऊन व्यवस्था अद्ययावत करावी.