Lokmat impact : पिझ्झा प्रकरणातील विद्यार्थिनीचे वसतिगृह बदलले; समाजकल्याण विभागाकडून आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 10:31 IST2025-02-14T10:30:17+5:302025-02-14T10:31:16+5:30
विद्यार्थिनींना वसतिगृहातून महिन्यासाठी काढून टाकण्याची नोटीस दिली. मात्र

Lokmat impact : पिझ्झा प्रकरणातील विद्यार्थिनीचे वसतिगृह बदलले; समाजकल्याण विभागाकडून आदेश
पिंपरी : मोशी येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थिनींनी पिझ्झा मागविल्याबाबत प्रशासनाने संबंधित विद्यार्थिनींना वसतिगृहातून महिन्यासाठी काढून टाकण्याची नोटीस दिली. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवल्यानंतर आता समाजकल्याण विभागाने संबंधित विद्यार्थिनीचे वसतिगृह बदलले आहे. वसतिगृह बदलून देण्यासाठी विद्यार्थिनीने समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांकडे अर्ज केला होता.
मोशी येथील २५० क्षमता मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील एका खोलीत पिझ्झाचा रिकामा बॉक्स आढळून आला. वसतिगृहात बाहेरील खाद्यपदार्थ मागवण्यास मनाई आहे. त्याबाबत वसतिगृह प्रशासनाकडून संबंधित विद्यार्थिनींना नोटीस देण्यात आली. तसेच पिझ्झा कोणी मागवला याबाबत सांगितले नाही तर एक महिन्यासाठी वसतिगृहातून काढले जाईल, असे नोटिसीमध्ये म्हटले होते. त्यामुळे एका विद्यार्थिनीने पालकांना बोलावून थेट समाजकल्याण आयुक्तांकडे गाऱ्हाणे घातले. तसेच विद्यार्थिनीने वसतिगृह बदलून देण्याची मागणी केली. या प्रकरणात ‘लोकमत’ने आवाज उठवून पाठपुरावा केला होता.
आता तरुणीचे महाविद्यालय आणि मोशी येथील वसतिगृह यात खूप अंतर असल्याने तिला दररोज ये-जा करण्यासाठी अडचणीचे ठरत होते. त्यामुळे तिला विश्रांतवाडी, येरवडा येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश बदलून देण्यात आला आहे. याबाबत समाजकल्याण आयुक्तालयाचे सहआयुक्त (शिक्षण) प्रमोद जाधव यांनी आदेश दिले आहेत.
गृहपालांवर कारवाईची मागणी
पिझ्झा आणि नोटीस प्रकरणाची तातडीने चौकशी करून मोशी येथील वसतिगृहाच्या गृहपालांवर कारवाई करावी, अशी मागणी स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेकडून करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी समाज कल्याण विभागाने नियमावली तयार करावी. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि सुरक्षेसाठी विशाखा समिती प्रत्येक वसतिगृहात स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
संबंधित विद्यार्थिनीने वसतिगृह बदलून देण्यासाठी अर्ज केला होता. मोशी येथील वसतिगृह आणि तिचे महाविद्यालय हे अंतर खूप असल्याने तिच्या सोयीसाठी विनंतीनुसार वसतिगृह बदलून देण्यात आले आहे. - प्रमोद जाधव, सहआयुक्त (शिक्षण), समाजकल्याण आयुक्तालय