लोकमत 'लोक'जीबी विशेष: सामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या लोकजीबीला सुरुवात
By प्रमोद सरवळे | Published: March 7, 2024 11:44 AM2024-03-07T11:44:37+5:302024-03-07T11:45:01+5:30
सामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी लोकमतने पिंपरी चिंचवड महापालिकेची लोकजीबी आयोजित करण्यात आली आहे
पिंपरी : गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण सभा (जीबी) झालीच नाही. त्यामुळे शहरातील धोरणात्मक निर्णय रखडले आहेत. प्रशासक राजमध्ये केवळ देखभाल दुरुस्ती व पूर्वीच्या प्रकल्पाची कामे होत आहेत. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, असमान पाणीपुरवठा या समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. मग आम्ही आमचे प्रश्न कुणाला सांगायचे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी ‘लोकमत’कडे नोंदविल्या होत्या. सामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी लोकमतने पिंपरी चिंचवड महापालिकेची लोकजीबी आयोजित केली आहे.
'लोकमत लोकजीबी'ला शहरातील सर्व पक्षीय माजी नगरसेवकांसह माजी महापौरांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, माजी खासदार गजानन बाबर, माजी आमदार वल्लभ बेनके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यामध्ये माजी महापौर उषा ढोरे, राहुल जाधव, विलास लांडे, नितीन काळजे गटनेते नामदेव ढाके, माजी गटनेते सचिन चिखले, माजी सभापती सीमा सावळे यांसह सर्व पक्षीय नगरसेवक उपस्थित आहेत.
त्यासोबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक आयुक्त प्रदीप जांभळे, सहायक आयुक्त निलेश देशमुख, सहायक आयुक्त यशवंत डांगे, माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनीही हजेरी लावली होती. आजच्या प्रतिरूप सर्वसाधारण सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उषा उर्फ माई ढोरे, जबाबदारी बजावत आहेत. आजच्या या लोकजीबीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक त्यांचे प्रश्न मांडत आहेत. प्रतिरूप सभेची सुरुवात विषयांकच्या वाचनानंतर झाली.