लोकमत आयोजित केआरए ज्वेलर्स प्रस्तुत पुणेरी पाट्या प्रदर्शनास दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:02 AM2018-07-09T02:02:29+5:302018-07-09T02:02:44+5:30
अरे, हे वाचून तर बघ... सॉलिड आहे. आतापर्यंत व्हॉटसअॅप, फेसबुकवर एखाद-दुसरी पुणेरी पाटी वाचायला मिळत होती. इथे तर असंख्य पुणेरी पाट्या आहेत.
पिंपरी : अरे, हे वाचून तर बघ... सॉलिड आहे. आतापर्यंत व्हॉटसअॅप, फेसबुकवर एखाद-दुसरी पुणेरी पाटी वाचायला मिळत होती. इथे तर असंख्य पुणेरी पाट्या आहेत. एक से बढकर एक पुणेरी पाट्यांचा खजिना या प्रदर्शनाच्या निमित्ताने वाचायला, पाहायला मिळत आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी, पालक, तरुण आणि ज्येष्ठ यांच्या तोंडून व्यक्त होत होत्या. निमित्त होते लोकमत आयोजित पुणेरी पाट्या प्रदर्शनाचे.
उद्घाटन समारंभाची प्रतीक्षा न करताच, पिंपरी-चिंचवडकरांनी रविवारी सकाळी १० वाजल्यापासून चिंचवडगाव येथील गंधर्व हॉलमध्ये प्रदर्शन पाहण्यास गर्दी केली. खोचक, मार्मिक टिप्पणीतून जे सांगायचे ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनास पिंपरी-चिंचवडकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
लोकमत आयोजित कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स अर्थात केआरए ज्वेलर्स प्रस्तुत, मेन्स अॅव्हेन्यू यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडमध्ये पुणेरी पाट्यांचे पहिलेच प्रदर्शन घेण्यात आले. अगदी दारावरील बेल वाजविताना काय दक्षता घ्यावी, येथपासून ते वाहन पार्क करतेवेळी इतरांना त्रास होणार नाही, याची खबरदारी कशी घ्यावी, याबद्दलच्या खोचक, मार्मिक आणि सहज अर्थबोध होणाºया पुणेरी पाट्या वाचताना पिंपरी-चिंचवडकर रसिकांना हसू आवरत नव्हते. वर्तन कसे असावे, हे सांगण्यापासून चुकीचे वर्तन केले तर शिक्षा काय हेसुद्धा स्पष्ट करणाºया पुणेरी पाट्या पिंपरी-चिंचवडकरांच्या अंतर्मनाचा वेध घेत होत्या. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे म्हटले जाते. आपणास काय सांगायचे आहे, ते स्पष्टपणे सांगण्याचा पुणेरी बाणा या पाट्यांच्या माध्यमातून निदर्शनास येतो. याचा अनुभव प्रदर्शनास भेट देणाºयांनी घेतला. नियम पाळण्याचे सहकार्य करावे अन्यथा तशी सक्ती करण्यात येईल, ही शिस्त पालनासाठीची पुणेरी पाटी लक्ष वेधून घेत होती. त्याचबरोबर बेल एकदाच वाजवावी, आत नक्कीच ऐकायला येते या पाटीसह ‘दारावरची बेल वाजविल्यानंतर थोडी वाट पाहायला शिका, घरात माणसं राहतात, स्पायडर मॅन नाही’ अशा दैनंदिन जीवनात सर्वसाधारणपणे कसे वागावे हे सूचित करणाºया पुणेरी पाट्यांनी प्रदर्शन पाहणाºयांना बरीच काही शिकवण दिली.
एखाद्याला नाहक त्रास होईल असे वर्तन करू नये, असे वेगळ्या शैलीत सांगणाºया पुणेरी पाट्या खºया अर्थाने पुणेरी माणसाचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट करणाºया आहेत. स्वत:च्या घरापुरती सूचना असो, सोसायटीतील स्वच्छता, सुरक्षितता याबाबतची सूचनाही अशा वेगळ्या शैलीत मांडण्याची पुणेकरांची शैली हे पुणेरी पाट्यांचे खास वैशिष्ट्य असल्याचे प्रदर्शनस्थळी बोलले जात होते. येथे र्पाकिंग करू नये अन्यथा तुमच्या डोक्यातील आणि चाकातील दोन्ही हवा सोडण्यात येईल. तसेच येथे हापूसचे भाव फिक्स आहेत, घासाघीस करू नये अन्यथा पायरी दाखविण्यात येईल. बाहेरच्या कोणीही लिफ्ट वापरू नये, अडकल्यास सोसायटी जबाबदार राहणार नाही, अशा इशारावजा सूचना देणाºया पाट्या प्रदर्शनस्थळी लक्ष वेधून घेत होत्या.
पुणेरी पाट्या अन् सेल्फी
४प्रदर्शनस्थळी अनेकांनी पुणेरी पाट्यांच्या जवळ उभे राहून सेल्फी काढला. प्रदर्शनस्थळी लावलेल्या पुणेरी पाट्यांचे फोटो मोबाइलमध्ये कैद केले. एकाच ठिकाणी वैविध्यपूर्ण अशा पुणेरी पाट्या वाचण्यास मिळाल्याचा आनंद मनात साठवला जात असतानाच, पुणेरी पाट्यांचे फोटो मोबाइलमध्ये काढून मित्र परिवाराला व्हॉट्स अॅप ग्रुपवर पाठविले जात होते. रसिकांना उपलब्ध करून दिलेल्या वॉलवर पुणेरी पाट्यांच्या धर्तीवर पाटी लिहिण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी सकाळी ११ ते रात्री ८ हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.