लोकमत रिपोर्ताज : चार पिढ्यांपासून चार तास पाण्यासाठी रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 10:30 AM2023-03-14T10:30:51+5:302023-03-14T10:33:10+5:30
या गावच्या ग्रामस्थांना कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या हद्दीत सामावून घेण्यास तयार नाही...
- नारायण बडगुजर
पिंपरी :पुणे-मुंबई महामार्गालगत मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा टोलनाक्याजवळील शंकरवाडी क्र. १ येथे शनिवारी सकाळी सातची वेळ...वृद्ध महिला, तरुणी, तरुणांसह काहीजण एकाच नळावर पाण्यासाठी निळे कॅन घेऊन गर्दी करत होते. काहीजणी हंडा व कळशीमध्ये पाणी भरत होत्या. रात्रंदिवस भरधाव वाहनांनी वाहणाऱ्या महामार्गाच्या बाजूला पाणी भरणाऱ्या ग्रामस्थांचे हे चित्र नेहमीचेच. प्रशासनाच्या चुकीमुळे येथील चार पिढ्यांना पाण्यासाठी दररोज चार तास वाया घालवावे लागतात. तसेच कोणत्याही गाव व शहरात त्यांची नोंद होताना दिसत नाही. त्यामुळे या गावच्या ग्रामस्थांना कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या हद्दीत सामावून घेण्यास तयार नाही.
‘लोकमत’ने शंकरवाडीची पाहणी केली असता, ‘इंडिया’मधील ‘भारता’चे हे वास्तव समोर आले. एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा जल्लोष सुरू असताना, येथील ग्रामस्थ निर्वासितांसारखेच आयुष्य जगत असल्याचे दिसून आले.
औद्योगिक क्षेत्रामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने विकास झाला. विकासाचा हा झरा खेड, मुळशी आणि मावळ तालुक्यांतही पोहोचला. पुणे-मुंबई महामार्ग आणि द्रुतगती मार्ग मावळ तालुक्यातून जातात. त्यामुळे या भागात जणू विकासाची गंगाच अवतरली. मात्र, असे असले तरी पुणे-मुंबई महामार्गालगत असलेली ४५ ते ५० घरांची शंकरवाडी क्र. १ ही ३५० ते ४०० पर्यंत लोकसंख्येची वस्ती आजही तहानलेलीच आहे. येथे महामार्गालगत ढाबे, हाॅटेल तसेच इतर सुविधा आल्या. मात्र, या वस्तीतील घरांपर्यंत अद्यापही हक्काचे नळजोड पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे येथील घराघरांतील महिला, पुरुषांसह लहान मुलांनाही पाण्यासाठी दररोज महामार्गावर चार तास ठाण मांडून बसावे लागते.
पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोड येथून चार किलोमीटर अंतरावर शंकरवाडी क्र. १ ही वस्ती आहे. संत तुकोबारायांचे चिंतनस्थळ म्हणून ओळख असलेल्या घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला महामार्गाला लागूनच ही वस्ती आहे. महामार्गावरून वस्तीत प्रवेश केल्यावर प्रत्येक घर चढावर आहे. तसेच या वस्तीत एकही रस्ता नसून सर्व घरांसाठी निमूळत्या पायवाटाच आहेत. तेथे सायकल नेण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते. तरीही अशा घरांपर्यंत हंडा, कळशी, कॅनमधून पाणी घेऊन जाण्याचे कसब या कुटुंबातील प्रत्येकाकडे पिढीजात आहे. ते दररोज येथे पाहण्यास मिळते.