‘लोकमत’च्या ‘विश्वकर्मा : द ड्रीम बिल्डर्स’ कॉफीटेबल बुकचे आज प्रकाशन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:54 AM2018-07-23T00:54:34+5:302018-07-23T00:56:45+5:30
डॉ. के. एच. संचेती, डॉ. शां. ब. मुजुमदार, चंदू बोर्डे, पं. सुरेश तळवलकर, कीर्ती शिलेदार यांचा सन्मान
पुणे : आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यकर्तृत्वाची यशोगाथा उलगडणाऱ्या लोकमत माध्यम समूहाच्या ‘विश्वकर्मा- द ड्रीम बिल्डर्स आॅफ महाराष्ट्र अॅँड गोवा’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन उद्या (सोमवार) होणार आहे. कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टिन येथे हा सोहळा रंगणार आहे. दुपारी तीन वाजता प्रकाशन समारंभ होईल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, नॅशनल क्रेडाईचे अध्यक्ष (इलेक्ट) सतीश मगर प्रमुख पाहुणे आहेत. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह औद्योगिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रांतील विविध मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी आहेत.
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत बांधकाम व्यावसायिकांचा महत्त्वाचा सहभाग आहे. विकासाच्या पाऊलखुणा ओळखून गुंतवणुकीचे धाडस त्यांनी दाखविले. त्यातून राज्यातील अनेक भागांचा चेहरामोहराच बदलून गेला. एका अर्थाने ‘विश्वकर्मा’ म्हणूनच ते काम करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या कॉफीटेबल बुकमध्ये घेण्यात आला आहे. प्रगतीची शिखरे पाहत तरुणांनाही त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘आयकॉन्स’ ही कॉफीटेबल बुकची मालिका सुरू करण्यात आली आहे.
यशोशिखरावर पोहोचतानाच हजारोंच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण करणा-या ‘विश्वकर्मा’च्या गौरवगाथेचा भव्य अनावरण सोहळा सोमवारी होणार आहे. या समारंभाला मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर व वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार गौरव
‘विश्वकर्मा : द ड्रीम बिल्डर्स आॅफ महाराष्ट्र अँड गोवा’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करत सामाजिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या मान्यवरांचा ‘लोकमत महाराष्ट्र लीडरशिप अवॉर्ड’ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे, ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचा गौरव करण्यात येणार आहे.