लोणावळ्यात भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 09:52 PM2018-07-15T21:52:27+5:302018-07-15T21:53:01+5:30
येथील भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजीव तस्लिम शेख ( वय २० रा. परळी वैजनाथ, सध्या राहणार म्हाळुंगे चाकण) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे.
लोणावळा : येथील भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजीव तस्लिम शेख ( वय २० रा. परळी वैजनाथ, सध्या राहणार म्हाळुंगे चाकण) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजीव हा त्याच्या पाच मित्रांच्या समवेत भुशी धरण परिसरात वर्षाविहाराकरिता आला होता. भुशी धरणाच्या वरील बाजुला असलेल्या धबधब्यात ते भिजण्याचा आनंद घेत असताना राजीव धबधब्यात पडला व वाहून भुशी धरणात गेला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक जीवरक्षक साहेबराव चव्हाण, राजु पवार, दीपक कोळी आणि शिवदुर्गच्या टीमने धरणाच्या पाण्यात शोध मोहिम राबवत सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
लोणावळा परिसरात काल रात्रीपासून मुसळधरा पाऊस सुरु असल्याने धबधब्याना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. सुरक्षेबाबत सूचना देऊन देखील पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघात घडत आहेत. भुशी धरणात पर्यटक बुडण्याची यावर्षीची ही तिसरी घटना आहे.