नववर्ष स्वागतासाठी लोणावळा सज्ज
By admin | Published: December 21, 2015 12:27 AM2015-12-21T00:27:28+5:302015-12-21T00:27:28+5:30
नाताळाच्या सुटीला जोडून आलेल्या सलग चार सुट्या व थर्टी फर्स्ट नाइट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात मोठ्या संख्येने येणारे मुंबई-पुणेकर पर्यटक यांच्या स्वागतासाठी लोणावळानगरी
लोणावळा : नाताळाच्या सुटीला जोडून आलेल्या सलग चार सुट्या व थर्टी फर्स्ट नाइट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात मोठ्या संख्येने येणारे मुंबई-पुणेकर पर्यटक यांच्या स्वागतासाठी लोणावळानगरी
सज्ज झाली आहे. अनेक हॉटेलांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात
आली असून, थर्टी फर्स्टसाठी
पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोणावळ्यात जवळपास १८० लहान-मोठे हॉटेल आहेत. तसेच सेनेटोरियम, मोठ्या सोसायट्या व हजारोंच्या संख्येने सेकंड होम असल्याने पुढील दहा दिवस शहरात पर्यटकांची जत्राच भरणार आहे. या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अनेक हॉटेल व्यावसायिकांनी पार्ट्या व संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रविवार अखेरपर्यंत ३५ व्यावसायिकांनी शहर पोलिसांकडे वाद्य परवाना मिळावा, म्हणून अर्ज केले आहेत. सर्वत्र या उत्सवाची धूम सुरू आहे. या दहा दिवसांत येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या मात्र नाकी नऊ येणार आहेत.
तसेच शहरातील व पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते अपुरे पडणार असल्याने शहरात येताना पर्यटकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, तसेच शहरातील नागरिकांनी या काळात होणारी गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो चारचाकी वाहने रस्त्यावर न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात पार्ट्यांकरिता येणाऱ्या काही हुल्लडबाज पर्यटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, तसेच बेशिस्त वाहन चालवून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याकरिता वाहतूक पोलीस,
पोलीस मित्र, बे्रथ अॅनालायझर, स्ट्रायकिंग फोर्स आदीसह अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार
आहे. (वार्ताहर)