निसर्गचक्रीवादळाचा लोणावळा शहराला जोरदार तडाखा ; २४ तासांपासून वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:11 IST2020-06-04T12:05:38+5:302020-06-04T12:11:33+5:30
निसर्ग चक्रीवादळाने मंगळवारी सायंकाळपासून लोणावळा शहरात पाऊस व वारा सुरू झाला.

निसर्गचक्रीवादळाचा लोणावळा शहराला जोरदार तडाखा ; २४ तासांपासून वीज पुरवठा खंडित
लोणावळा : निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा लोणावळा शहरात वीज वितरण कंपनीला बसला आहे. वादळाने लोणावळा उपविभागातील लाईटचे १४० खांब पडले आहेत. यामध्ये उच्चदाब वाहिनीचे ६१ व लघुदाब वाहिनीचे ७९ खांब पडले आहेत. तर उच्च दाब वाहिनीचे १२ व लघुदाब वाहिनीचे ३३ खांब वाकले असल्याची माहिती वीज महावितरणचे लोणावळा उपविभागीय अभियंता उमेश चव्हाण यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळाने मंगळवारी सायंकाळपासून लोणावळा शहरात पाऊस व वारा सुरू झाला. बुधवारी पावसाचा व सोसाट्याच्या वार्या जोर वाढल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली.त्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. लोणावळा उपविभागाला विद्युत पुरवठा करणार्या १०० केव्ही सब स्टेशनला वीज पुरवठा करणारी टॉवर लाईन सुरू झाली असली तरी दुरुस्ती कामाकरिता फिडर बंद ठेवण्यात आले आहेत.
निसर्ग वादळाने खंडाळा पोलीस चौकीचे पत्रे उडाले. पत्रे उडाल्याने पोलिसांना पावसात थांबण्याची वेळ आली आहे.
एमटीडीसीमध्ये घरांची पडझड
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कार्ला येथील निवासस्थाने वादळाने नुकसान झाले आहे. अनेक घरांची छपरे उडाली असून झाडे पडली आहेत.