लोणावळा नगरपरिषदेच्या तुंगार्ली धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 06:02 PM2017-11-29T18:02:30+5:302017-11-29T18:03:13+5:30
लोणावळा नगरपरिषदेच्या स्व मालकीचे असलेल्या तुंगार्ली धरणाला मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली असल्याने हे धरण धोकादायक बनू लागले आहे. ब्रिटिश काळात 1916 साली या धरणाची बांधणी करण्यात आली होती. नुकतेच या धरणाने शंभरी पुर्ण केली आहे.
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या स्व मालकीचे असलेल्या तुंगार्ली धरणाला मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली असल्याने हे धरण धोकादायक बनू लागले आहे. ब्रिटिश काळात 1916 साली या धरणाची बांधणी करण्यात आली होती. नुकतेच या धरणाने शंभरी पुर्ण केली आहे.
स्वत:च्या मालकीचे धरण असलेली लोणावळा ही एकमेव नगरपरिषद आहे. मागील काही वर्षापासून या धरणाच्या भिंतीमधून पाणी गळती अल्पप्रमाणात सुरु होती. आता मात्र धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे. तुंगार्ली धरणाच्या मजबुतीकरणाचा विषय मागील अनेक वर्षापासून रखडलेला आहे. नगरपरिषदेने 2001 सालापासून शासनाकडे या धरणाच्या मजबुतीकरणाकरिता निधी मिळावा अशी मागणी लावून धरली आहे मात्र पाठपुराव्याचा अभाव व शासनाचे उदासिनतेचे धोरण यामुळे हा विषय अद्याप लालफितीत आडकला आहे. 20 हेक्टर जागेत 1.3 एमएलडी क्षमतेचे हे धरण आहे. न्यू तुंगार्ली परिसरात या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मजबुतीकरणाअभावी धरण अडगळीस पडले आहे. धरणाच्या मजबुतीकरणाचा विषय व गाळ काढण्याचे काम मार्गी लागल्यास शहरातील पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे. देखभाल व दुरुस्ती अभावी धरणाच्या भितीवर मोठ्या प्रमाणात गवत व झाडे झुडपे वाढली आहेत तसेचर धरणाच्या भिंतीच्या दगडी देखिल पडू लागल्या असून सुरक्षा रेलिंग तुटलेले आहे. धरणाच्या खालून पांगळोली ठाकरवाडीकडे जाणार्या रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहत आहे. यदाकदाचित धरणाची गळती वाढली व धरण फुटल्यास न्यु तुंगार्ली भागाला याचा मोठा धोका निर्माण होणार आहे. वेळीच या धरणाच्या मजबुतीकरणाचे काम सुरु करणे गरजेचे असून याकरिता नगरपरिषदेने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी नागरिक करत आहे. या धरणाच्या लगतची काही जागा ही नगरपरिषदेचे उद्यान, पिकनिक व मनोरंजन पार्क करिता आरक्षित आहे. या जागेचा देखिल विकास झाल्यास लोणावळ्यात येणार्या पर्यटकांसाठी ते मोठे आकर्षण ठरणार आहे. तुर्तास तरी या धरणाच्या मजबुतीकरणाच्या मुद्दयाकडे गांर्भिर्याने पाहण्याची गरज आहे.