मॅट्रिमोनीवर जीवनसाथी शोधताय ? सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 08:15 PM2019-09-29T20:15:53+5:302019-09-29T20:16:51+5:30

ऑनलाईन मॅट्रिमोनी साइटवरुन अनेक महिलांची फसवणूक हाेत असल्याचे समाेर आले आहे.

Looking for a spouse on Matrimony ? be Careful! | मॅट्रिमोनीवर जीवनसाथी शोधताय ? सावधान !

मॅट्रिमोनीवर जीवनसाथी शोधताय ? सावधान !

Next

- नारायण बडगुजर 
पिंपरी : एकाकी असलेल्या त्या महिलेने जीवनसाथी निवडण्यासाठी एका मॅट्रिमोनी साइटवर आपली माहिती दिली़ त्यातून एका परदेशात राहणाऱ्या, उच्च शिक्षित तरुणाने संपर्क साधला़ फेसबुकवर त्यांचे चॉटिंग सुरू झाले़ त्यानंतर त्यांनी एकमेकांना आपले मोबाइल नंबर दिले़ त्यावरून मेसेजची देवाण-घेवाण सुरू झाली़. एकमेकांना फोटो पाठविले़ त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही संमती दर्शविल्यावर त्याने आपण भारतात येत असल्याचे सांगितले; पण त्यात एक अडचण आली़ विमानतळावर त्याला कस्टमने अडविले. त्याच्याकडे डॉलरमध्ये कॅश आढळून आल्याने पकडले़ त्यांच्यातून सुटकेसाठी पैसे हवे असल्याचे त्याने हिला सांगितले. तिनेही विश्वास ठेवून सांगितलेल्या बँक खात्यात पैसे भरत गेली. काही लाख रुपये दिल्यानंतरही त्याची मागणी न संपल्याने तिला संशय आला. तेव्हा जो फोटो त्याने पाठविला होता, तो त्याचा नसल्याचे तिच्या लक्षात आले़ आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले़ तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

नोकरी, करिअर किंवा कौटुंबिक कारणांमुळे अनेक जणांचे लग्नाचे वय निघून जाते. काही वेळा परस्परांचे न पटल्याने घटस्फोट होतात. त्यामुळे अशा व्यक्ती मनाने एकाकी पडत जातात. कोणीतरी आपले ऐकणारे असावे, आपल्याला मनसोक्त गप्पा मारता याव्यात, असे वाटते. एक सच्चा जीवनसाथीच ही गरज पूर्ण करू शकतो, अशी मानसिकता होते. मात्र, तो शोधायचा कसा व कुठे, हा प्रश्न असतो. त्यासाठी बहुतांश वेळा मॅट्रिमोनी वेबसाईट्सचा पर्याय निवडला जातो ; मात्र बेसावध राहिल्याने कित्येक वेळा फसवणूक होते आणि ज्याच्यासोबत आयुष्य घालविण्याचे स्वप्न रंगविलेले असते, त्याच्याकडून मोठा गंडा घातला जातो. 

बहुतांश उच्च शिक्षितांकडून  विवाह जुळविणाऱ्या वेबसाइट अर्थात मॅट्रिमोनी वेबसाइटवर प्रोफाईल तयार करून अनुरूप जोडीदार शोधला जातो. यात तरुणी, विधवा, घटस्फोटित महिला तसेच तिशी ओलांडलेल्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. अशा बहुतांश महिला मनाने एकाकी पडलेल्या असतात. त्यांना मानसिक आधाराची गरज असते. त्यांच्या प्रोफाईल तसेच अपेक्षेनुसार संबंधित वेबसाइटवरून त्यांना ‘फ्रेन्डस’बाबतच्या ‘सजेशन’ येतात. तसेच काही जणांकडून त्यांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली जाते. यात काही प्रोफाईल बनावट नावाने तसेच फोटो दुसऱ्याचा वापरून केलेले असतात. यात संबंधित व्यक्ती मराठी किंवा भारतीय नाव वापरून भारतीय व्यक्तीचा सुंदर फोटो त्याच्या प्रोफाईलला ठेवत असते. तसेच, आपण भारतीय असून नोकरी किंवा उद्योग-व्यवसायानिमित्त दुसऱ्या देशात राहत असल्याचे सांगते. त्यामुळे सदरचे प्रोफाईल बनावट असल्याचे लगेचच लक्षात येत नाही.

महिलेने फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दुसऱ्या देशातील मोबाइल क्रमांकावरून संबंधित व्यक्ती चॅटिंग करते. काही दिवसांनंतर व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून चॅटिंग सुरू होते. मात्र, व्हिडीओ कॉलवर बोलण्याचे संबंधित व्यक्तीकडून टाळले जाते. त्यामुळे तरुणी किंवा महिला त्याचा चेहरा प्रत्यक्षात बघू शकत नाही. याचाच गैरफायदा घेऊन गोड बोलून महिलेची सहानुभूती मिळविली जाते. ‘मी भारतात येणार आहे; पण सध्या काही काम नाही. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू तयार असशील तर मी भारतात येईन,’ अशी विचारणा केली जाते. त्यामुळे संबंधित महिला भावनिक होते. लग्नास तयार असल्याचे सांगते. 

‘तुझ्यासाठी महागडा फोन घेतला आहे. तसेच काही दागिने आणि वस्तू तुझ्यासाठी पाठवत आहे,’ असे महिलेला सांगितले जाते. त्यानंतर काही दिवसांनी भारतीय क्रमांकावरून फोन येतो. दिल्लीच्या कस्टम ऑफिसमधून अधिकारी बोलत असल्याचे सांगण्यात येते. ‘तुमचे पार्सल आले आहे. ते स्कॅन केले असता त्यात महागडा मोबाइल, ज्वेलरी व काही वस्तू आहेत. त्याची कस्टम ड्युटी व १८ टक्के जीएसटीची रक्कम भरा. नाही तर पार्सल मिळणार नाही,’ असे सांगून बँकेचा खाते क्रमांक दिला जातो. भावनिक होऊन संबंधित महिला त्या खात्यात पैसे भरतात.

याशिवाय, आणखी एका प्रकारे महिलांची फसवणूक केली जाते. त्यात संबंधित व्यक्ती लग्नाची मागणी घातल्यानंतर आपले न्यूड फोटो महिलेला पाठवितात. त्यानंतर तिला तिचे असेच फोटो पाठविण्यास सांगतात. नाही-होय करत काही महिला आपले तसले फोटो पाठवितात. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्याकडून धमकावणे सुरू होते़ तिच्याकडे पैशांची मागणी करून ते न दिल्यास ‘तुमचे न्यूड फोटो व्हायरल करू,’ असे सांगितले जाते.

नायजेरियन टोळी : काय काळजी घ्याल?
मॅट्रिमोनी साईटबाबत होणाऱ्या फसवणुकीमध्ये सर्व चूक संबंधित महिलेची असते, हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण जिला पाहिलेच नाही अशा व्यक्तीला लाखो रुपये पाठविले जातात. तसेच, ज्याला केवळ सोशल मीडियाद्वारे काही महिने अधिक ओळखत आहोत, अशांना आपण आपले सर्वस्वी वैयक्तिक फोटो पाठवत असतो. अशा प्रकारात ९९ टक्के महिलांची फसवणूक होत आहे. पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारीत अपवादात्मकरीत्या एखादा पुरुष आढळून येतो. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना, त्याला आपले वैयक्तिक फोटो पाठवू नयेत. चॅटिंगसाठी नव्हे, तर आयुष्यभरासाठीचा जोडीदार हवा असतो. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊ नये. प्रत्यक्ष भेटून संबंधित व्यक्तीची कौटुंबिक माहिती जरूर घ्यावी. तसेच, आपल्या कुटुंबाबत किंवा  उत्पन्नाबाबत सविस्तर माहिती खात्री झाल्याशिवाय देऊ नये.

सेकंड ओपिनियन घ्यायला हवे
ऑनलाइन व्यवहार करताना एकदा तरी सेकंड ओपिनियन घ्यावे. ऑनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपण ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहोत, ते नक्की कोणाचे आहे, याबाबत खात्री करावी. तसेच, कोणाला तरी मदत करायची आहे किंवा भावनेच्या आहारी न जाता अशा पद्धतीने व्यवहार करताना आपल्या घरातील व्यक्ती किंवा जवळच्यांना एकदा सांगावे आणि त्यांचे म्हणणे समजून घ्यावे.
- सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

Web Title: Looking for a spouse on Matrimony ? be Careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.