हरविलेल्या पाटल्या अन् गवसलेली माणुसकी....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:58 PM2018-08-10T16:58:30+5:302018-08-10T17:17:48+5:30
महिन्याला मिळणाऱ्या पाच हजारांच्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यातूनही त्यांनी हौसेपोटी तीन तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या करून घेतल्या होत्या. मात्र....
मंगेश पांडे
पिंपरी : ऐंशी वर्षांच्या आजीबार्इंच्या हरविलेल्या पाटल्या सापडल्या नाहीत. मात्र, त्या पाटल्या मिळविण्यासाठी आजीबाईंची सुरु असलेली धडपड पाहून पोलिसांनीच वर्गणी काढत आजीला पाटल्या घेवून दिल्या. याचे ऋण व्यक्त फेडण्यासाठी आजीबार्इंनी पोलीस ठाण्यात येवून पोलिसांचा नारळ व पेढे देवू सत्कार केला. यातून पोलिसांच्या माणुसकीचे अनोखे दर्शन घडले.
शांताबाई चिंचणे (वय ८०) या पिंपळे गुरव येथे एकट्याच राहतात. महिन्याला मिळणाऱ्या पाच हजारांच्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यातूनही त्यांनी हौसेपोटी तीन तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या करून घेतल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यात आजी उपचारासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. त्यावेळी पाटल्या रविल्या. पै-पै जमवून तयार केलेल्या पाटल्या गेल्याने आजीबाई अतिशय निराश झाल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी सांगवी पोलिसात तक्रार देखील दिली,परंतु, काही महिने उलटूनही पाटल्या काही त्यांना परत मिळाल्या नाहीत. अखेर आजबाईंनी त्यावेळी सांगवी ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक निरीक्षक बलभीम ननावरे यांना सर्व हकिगत सांगितली. आजींच्या तक्रारीची दखल घेत ननावरे यांनी तपासाला सुरूवात केली. त्यांच्या पाटल्या काही सापडल्या नाहीत. दरम्यान, पाटल्या परत मिळतील या आशेनं आजी दर आठवड्याला सांगवी पोलीस ठाण्यात यायच्या. मात्र, प्रत्येक वेळी त्या रिकाम्या हातानेच घरी परतायच्या.
पाटल्या मिळविण्यासाठी सुरु असलेली आजींची तळमळ पोलिसांना न पहावल्याने अखेर ननावरे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून नवीन पाटल्या आजीला घेवून दिल्या. यातून पोलिसांतील माणुसकीचे दर्शन घडले. यानंतर हे ऋण फेडण्यासाठी आजींनी श्रीफळ आणि पेढे देवून पोलीस अधिकारी व कर्मचारयांचा सत्कार केला. या सर्व प्रवासात पोलीस आणि आजी आपुलकीचे नाते निर्माण झाले असून आजी देखील नेहमी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधत असतात.