वाहतूक पोलिसांना चुकविण्याच्या प्रयत्नात गमावला पाय; चिंचवड येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:32 PM2017-12-21T15:32:44+5:302017-12-21T15:38:57+5:30
लोखंडी सळई घेवून जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा पाय अधू झाला. वाहतूक पोलिसाला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकावर पाय गमावण्याची वेळ आली आहे.
पिंपरी : लोखंडी सळई घेवून जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा पाय अधू झाला. वाहतूक पोलिसाला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकावर पाय गमावण्याची वेळ आली आहे. प्रत्यक्षदर्शींकडून अपघातामागील खऱ्या कारणाचा उलगडा झाला. बुधवारी चिंचवड येथे घडलेल्या अपघाताची शहरात सर्वत्र चर्चा आहे.
चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल चौकातून रेवान्ना अश्रुबा कोपनर (वय ३५, रा. चोपडेवाडी, बीड) हा ट्रक घेऊन जात होता. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून त्याने सिग्नल तोडला. या वेळी वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतू तो तेथे थांबला नाही. त्याने ट्रक तसाच पुढे नेला. वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र त्यांना न जुमानता तो चपळाईने निघून जाऊ लागला. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने रस्त्यातच ट्रक थांबवला. खाली उतरला. काही अंतर पुढे पायी जात असतानाच, ट्रकला हॅन्डब्रेक न लावल्यामुळे ट्रक आपोआप उताराने पुढे जाऊ लागला. विनावाहक ट्रक उताराने खाली आल्यास दुर्घटना घडू शकते, हे लक्षात येताच, त्याने धावपळ केली. चालत्या ट्रकमध्ये चढण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र ट्रकमध्ये चढण्यापूर्वीच ट्रक दुभाजकाला धडकला. ट्रक थांबविण्यासाठी धावपळ करत असताना, दुभाजकाला धडकून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्याचा डावा पाय निकामी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नियमांचे पालन केल्यास टळेल धोका
चिंचवड विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक संजीव पाटील म्हणाले, की सिग्नल तोडून जाणाऱ्या वाहनचालकाला अडविणे चुकीचे नाही. पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या वाहनचालकांच्या ताब्यातील वाहनाची कागदपत्रे नसतात. अनेकदा जुनी वाहने धोकादायक ठरणारी असतात. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला टाळून बेपर्वाईने कृती करणे वाहनचालकांना स्वत: साठी तसेच रहदारीच्या रस्त्यावर इतरांसाठीही असुरक्षित ठरणारे आहे. हे बुधवारच्या घटनेतून निदर्शनास आले.