कमळ फुलणार, की चालणार घड्याळ?

By admin | Published: February 23, 2017 02:38 AM2017-02-23T02:38:47+5:302017-02-23T02:38:47+5:30

पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या मावळ तालुक्यात यावेळी पुन्हा कमळ फुलणार की घड्याळ चालणार ही

The lotus blossom, or the clock going on? | कमळ फुलणार, की चालणार घड्याळ?

कमळ फुलणार, की चालणार घड्याळ?

Next

लोणावळा : पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या मावळ तालुक्यात यावेळी पुन्हा कमळ फुलणार की घड्याळ चालणार ही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गावाच्या पारापासून सोशल मिडियांच्या पोस्टपर्यत सर्वत्र याच चर्चेला उधाण आले आहे. प्रत्येक जण आपल्या संबंधातील उमेदवार कशाप्रकारे निवडून येईल यांचे अंदाज सांगत आहेत. येऊन येऊन येणार कोण, घासून नाही ठासून येणार अशा पोस्ट व अंदाजामुळे निवडणूकीचा शांत झालेला धुरळा पुन्हा उधळत आहे.
मावळ तालुका २० वषार्पासून भाजपाच्या ताब्यात आहे. पूर्वी कॉँग्रेसचा जिल्ह्यातील बालेकिल्ला असलेल्या मावळचा गड राष्ट्रवादीला पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे एकदा सुध्दा जिंकता आलेला नाही. याचे शल्य खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखविले आहे. मात्र त्याचे कसलेही सोयरसुतक मावळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना नाही. या गटबाजीचा फायदा घेत मावळात तेवढी ताकद नसतानाही भाजपा कायम विजय मिळवत गेला. ग्रामीण भागात हातपाय पसरल्याने मागील काही काळापासून मावळ तालुका भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात विजय मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने यावेळी कंबर कसली होती. मात्र जागा वाटपात झालेल्या वादातून राष्ट्रवादी फुटल्याने परिस्थिती नाजुक बनली होती. असे असले तरी मावळात राष्ट्रवादीची मोठी ताकद असल्याने व अजित पवार यांनी सभा घेत मावळात नेत्यांच्या मागे न जाता पक्षाला मतदान करा असे आव्हान केले होत.े याप्रमाणे मावळात राष्ट्रवादीचे घड्याळ चालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मावळात सभा घेत मावळ व जिल्हा राष्ट्रवादीमुक्त करण्यासाठी तो प्रथम पवारमुक्त करा असे आवाहन केले होते. आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनी मावळ व जिल्हा घड्याळमुक्त करण्याचा विडाच उचलला आहे. याची सुरुवात त्यांनी लोणावळा, तळेगाव व आळंदी नगर परिषद ताब्यात घेत केली आहे. त्यांचीच पुनरावृत्ती मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये होणार का याकडे तालुक्याचे लक्ष आहे.
यावेळी प्रामुख्याने भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांमध्ये तिरंगी सामना रंगला होता. काही ठिकाणी तो भाजपा व राष्ट्रवादी तर एक ठिकाणी भाजपा व समांतर राष्ट्रवादी असा थेट रंगला असल्याने कोण बाजी मारणार कोणाची नाव तरंगणार व कोण बुडणार या चर्चांना उधाण आले आहे. लक्षवेधी लढती ठरलेल्या वडगाव जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांचा भाचा व राष्ट्रवादी युवकचा जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय शेवाळे यांना उमेदवारी दिल्याने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या वडेश्वर पंचायत समिती गणात भाजपाचे गणपत सावंत, शिवसेनेचे सुनिल शिंदे व राष्ट्रवादीचे बंडखोर नारायण ठाकर यांच्यात रंगलेला चौरंगी सामना लक्षवेधी ठरला आहे. येथे नेवाळे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. सरपंच संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यामुळे चर्चेत आलेल्या टाकवे गणात राष्ट्रवादीचे शिवाजी आसवले, भाजपाचे शांताराम कदम, शिवसेनेचे दत्तू मोधळे, बंडखोर दत्तात्रय पडवळ व तुकाराम आसवले व काँग्रेसचे शांताराम नरवडे यांच्यात सामना रंगल्याने या ठिकाणी मतांची विभागणी झाली आहे. येथे मतदार कोणाच्या बाजुंने कौल देणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. पवनमावळ व इतर भागात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी अशा लढती झाल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे. प्रत्येकजण आपापल्या परींने निकालांचे विश्लेषण करत असले तरी मतदारांनी कोणाला कौल दिला आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (वार्ताहर)

लक्षवेधी लढती : तालुक्यात उत्सुकता
खडकाळा जिल्हा परिषद जागेसाठी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रामनाथ वारिंगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे यांचे चिरंजिव सुनिल ढोरे व मावळातील प्रसिध्द बैलगाडा मालक व समांतर राष्ट्रवादी व शिवसेना पुरस्कृत उमेदवार बाबुराव वायकर यांच्यात तिरंगी सामना रंगला होता. यामध्ये कोण गुलाल उधळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दुसरी लक्षवेधी लढत इंदोरी सोमाटणे जिल्हापरिषद या जागेसाठी झाली आगे. येथे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस व मावळचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे व भाजपाचे पुणे महानगर नियोजन समिती सदस्य व सरपंच नितिन मराठे यांच्यात थेट पध्दतीने झाली आहे. या मतदार संघात माजी आमदार दिगंबर भेगडे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व सहकारमहर्षी माऊली दाभाडे यांची निवासस्थाने असल्याने येथे कोण बाजी मारणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: The lotus blossom, or the clock going on?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.