कोरोनाच्या संकटात एलपीजीची चलती, दहा महिन्यात वाढली १२ लाख टन सिलिंडरची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:16 AM2021-03-16T07:16:23+5:302021-03-16T07:18:14+5:30
पेट्रोलियम मंत्रालयाने जानेवारी, २०२१ अखेरचा एलपीजी वापराचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकसंख्या देशात २०१७ मध्ये २ कोटी होती.
विशाल शिर्के -
पिंपरी (पुणे) : कोरोना काळामध्ये डिझेलसह विविध उद्योगांच्या उत्पादनांची मागणी घटली. मात्र, या काळामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे. टाळेबंदी काळात वाढलेला वापर, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही वर्षांत वाढलेली संख्या अशा विविध कारणांमुळे गेल्या दहा महिन्यांत घरगुती गॅसचा वापर तब्बल १२ लाख टनांनी वाढून २३१ लाख टन झाला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने जानेवारी, २०२१ अखेरचा एलपीजी वापराचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकसंख्या देशात २०१७ मध्ये २ कोटी होती. त्यात २०२१ पर्यंत ८ कोटी १ लाखापर्यंत वाढ झाली, तर इतर गॅस सिलिंडरधारकांची संख्या २०२१ अखेरीस २८.८२ कोटींवर गेली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरधारकांची टक्केवारी २०१४ रोजी ५५ टक्के होती.
उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टाळेबंदी काळात उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येकाला तीन मोफत सिलिंडर देण्यात आले. या सर्वांचा परिणाम एलपीजीची मागणी वाढल्यात झाल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक सुबोध डाकवाले यांनी सांगितले.
एलपीजी गॅसधारक
२०१५ १४.८६ कोटी
२०१९ २६.५४ कोटी
२०२० २७.८७ कोटी
२०२१ २८.८२ कोटी
‘उज्ज्वला’चे ग्राहक
२०१७ २.०० कोटी
२०१८ ३.५६ कोटी
२०१९ ७.१९ कोटी
२०२० ८.०२ कोटी
२०२१ ८.०१ कोटी