मशीनमध्ये स्पार्क होऊन स्फोट? तळवडे दुर्घटनेतील आगीचे कारण समोर

By नारायण बडगुजर | Published: December 10, 2023 09:56 PM2023-12-10T21:56:41+5:302023-12-10T21:59:33+5:30

तळवडे येथील ज्योतिबानगर येथे वाढदिवसाच्या केकसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘स्पार्कल कँडल’ बनविणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून स्फोट झाला.

machine sparks and explodes the reason for the fire in the talawade accident came to light | मशीनमध्ये स्पार्क होऊन स्फोट? तळवडे दुर्घटनेतील आगीचे कारण समोर

मशीनमध्ये स्पार्क होऊन स्फोट? तळवडे दुर्घटनेतील आगीचे कारण समोर

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : मशीनमध्ये स्पार्क होऊन ठिणगी उडाली आणि शोभेच्या दारूचा स्फोट झाला, असे तळवडे स्फोट प्रकरणातील जखमींकडून सांगण्यात येत आहे. मोठ्या तीव्रतेचा स्फोट झाल्याने अर्धवट उघडे असलेले शटर आदळले आणि काही महिला कंपनीत अडकून होरपळल्या.

तळवडे येथील ज्योतिबानगर येथे वाढदिवसाच्या केकसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘स्पार्कल कँडल’ बनविणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून स्फोट झाला. या दुर्घटनेत सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर महिला होरपळल्या. यातील जखमींना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यातील काही रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांना घटनेबाबत सांगितले.

शिवराज एंटरप्रायजेस या कंपनीत ‘स्पार्कल कँडल’ बनिवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी काही महिला ‘स्पार्कल कँडल’ला बटन बसवित होत्या. काही महिला पॅकिंग करीत होत्या. तर काही महिला कंपनीतील शटरजवळ असलेल्या मशीनवर ‘स्पार्कल कँडल’च्या कांड्यांमध्ये पावडर भरण्याचे काम करत होते. पावडर भरत असताना मशिनमध्ये अचानक ‘स्पार्क’ झाला. त्यानंतर ठिणगी उडून ज्वालाग्राही असलेल्या पावडरने पेट घेतला. क्षणातच आगीचा लोळ तयार झाला आणि कंपनीत पसरवलेल्या पावडरने देखील पेट घेतला. एका क्षणात पावरडरने पेट घेतल्याने मोठ्या तीव्रतेचा स्फोट झाला.

दरम्यान, कंपनीत नेहमीप्रमाचे शटर अर्धवट उघडे ठेवून काम सुरू होते. त्यावेळी मशीन व शटरजवळ असलेल्या महिलांना मशिनकडून आगीचे लोळ येताना दिसले. त्यामुळे काही महिलांनी लगेचच बाहेर धाव घेतली. त्याचवेळी अचानक स्फोट झाल्याने शटर खाली पडले. त्यामुळे इतर महिलांना बाहेर पडणे शक्य झाले नाही.

कंपनीत सर्वत्र पसरवली होती पावडर

‘स्पार्कल कँडल’ बनविण्यासाठी फटाक्याच्या शोभेच्या दारुचा वापर होतो. शिवराज एंटरप्रायजेस या कंपनीत दररोज दोन ते तीन पोती पावडर लागत होती. ही पावडर ओलसर असल्याने ती सुकवण्यासाठी कंपनीतच सर्वत्र पसरवून ठेवण्यात येत होती. सुकलेली पावडर ‘स्पार्कल कँडल’च्या कांड्यांमध्ये भरण्यात येत होती. सुकवण्यासाठी पसरविण्यात आलेल्या पावडरमुळे आगीची तीव्रता वाढून स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: machine sparks and explodes the reason for the fire in the talawade accident came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग