मावळ मतदारसंघामधून ‘वंचित’कडून माधवी जोशी
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 20, 2024 09:48 PM2024-04-20T21:48:09+5:302024-04-20T21:48:53+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसताना डॉ. अक्षय गंगाराम माने आणि सचिन महिपती सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज नेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर झाली आहे. यात मावळ मतदारसंघातून माधवी जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जोशी यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘वंचित’मध्ये प्रवेश केला.
मावळ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसताना डॉ. अक्षय गंगाराम माने आणि सचिन महिपती सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज नेला होता. मात्र, ऐनवेळी माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मावळमध्ये ‘वंचित’ने तिसरा पर्याय म्हणून पुढे आला आहे.
मागील वेळी पाऊण लाख मते
मावळ मतदारसंघात वंचितला मानणारा पाऊण लाखभर मतदार आहे. मागील वेळी घाटाखालील म्हणजेच रायगड जिल्ह्यातील राजाराम पाटील यांनी ‘वंचित’कडून निवडणूक लढविली होती. त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची ७५ हजार ९०४ मते मिळवत लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे १७,२०९ आणि १७,७९४ मते घेतली. त्या खालोखाल पनवेलमध्ये १५,९२६ आणि मावळमध्ये ११,७३१ मते मिळविता आली. उरण आणि कर्जतमध्ये त्यांना दहा हजारांपेक्षा कमी मते मिळाली होती.