संत तुकाराम महाराज देवस्थान अध्यक्षपदी मधुकर मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 02:24 PM2019-04-01T14:24:56+5:302019-04-01T14:25:43+5:30
संस्थानच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार होते तर विश्वस्त मंडळासाठी १८ उमेदवार होते.
देहूगाव : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या झालेल्या निवडणूकीत मधुकर भिकाजी मोरे यांची अध्यक्षपदी तर संजय मोरे, संतोष नारायण मोरे, विशाल केशव मोरे, अजित लक्ष्मण मोरे, माणिक मोरे व काशिनाथ मोरे या सहा जणांची विश्वस्त म्हणून निवड झाली आहे.
संस्थानच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार होते तर विश्वस्त मंडळासाठी १८ उमेदवार होते. यंदाचे अध्यक्षपद हे चक्राकार पध्दतीप्रमाणे गोविंद बुवा शाखेकडे असल्याने अध्यक्षपदासाठी गोविंद बुवा शाखेतून मधुकर भिकाजी मोरे, मुकुंद दामोदर मोरे व कैलास केशव मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यापैकी मधुकर मोरे यांनी १६० मते मिळाली व ते निवडून आले. विश्वस्त पदासाठी गोविंद बुवा, आबाजी बुवा व गणेश बुवा या तीन शाखेतून प्रत्येकी दोन विश्वस्त निवडून दिले जातात.
विश्वस्त पदासाठी गोविंद बुवा शाखेतून विश्वस्त पदासाठी संजय दामोदर मोरे, संतोष नारायण मोरे हे निवडून आले आहेत. याच शाखेतून प्रमोद मोरे, विश्वजीत मोरे, अशोक नारायण मोरे, नामदेव मोरे, सदाशिव महादेव मोरे व विक्रमसिंह मोरे यांनीही आपली उमेदवारी भरली होती. आबाजी बुवा शाखेतून माणिक मोरे, काशिनाथ मोरे हे निवडून आले.तर याच शाखेतून आकाश मोरे हे देखील निवडणूकीच्या रिंगणात होते. गणेश बुवा शाखेतून विशाल केशव मोरे व अजित लक्ष्मण मोरे हे विश्वस्त म्हणून निवडून आले आहेत.या शाखेतून धनंजय गोविंद मोरे, उमेश सुरेश मोरे, रोहन दिपक मोरे, सुबोध मोरे व सचिन मोरे यांनी देखील निवडणूक लढविली. मात्र, मतदारांचा कौल त्यांच्या विरोधात गेला. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून विजयी अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे उपस्थितांनी अभिनंदन केले व नवनिर्वाचित अध्यक्षांनी व विश्वस्तांनी श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन आज संस्थानचा कारभार आज पासून सुरू केला आहे.