मधुकर नाणेकर : पायांनी अपंग असूनही जोपासलाय भटकंतीचा छंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:34 AM2019-03-22T01:34:49+5:302019-03-22T01:35:08+5:30
दोन्ही पायांनी अपंग असूनही त्यावर जिद्दीने मात करून जगण्याचा आनंद घेणारे मधुकर नाणेकर हे दुचाकीवरून भटकंती करण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून छंद जोपासत आहेत.
- संजय माने
पिंपरी - दोन्ही पायांनी अपंग असूनही त्यावर जिद्दीने मात करून जगण्याचा आनंद घेणारे मधुकर नाणेकर हे दुचाकीवरून भटकंती करण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून छंद जोपासत आहेत. गोव्यापर्यंत भटकंती केलेल्या नाणेकर यांनी दुचाकीवरून पजांबचा दौरा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. दुचाकीवरून त्यांची स्वारी निघाली की लोक अक्षरश: कुतहलाने त्यांच्याकडे पाहत राहतात.
वयाची साठी उलटून गेली आहे. जुन्या स्कूटरवर बसण्यासाठी उभे राहता येईल, इतपतही दोन्ही पायात शक्ती नाही. अशा अवस्थेत नाणेकर आपल्या स्कूटरवर स्वार होतात. दुचाकीत त्यांनी काही बदल करून घेतले असून, पायाने किक मारावी लागते, त्याठिकाणी एक वेल्डिंग केलेला रॉड ते दुचाकी सुरू होण्यासाठी जोराने ओढतात. दुचाकी सुरू होताच त्यांना पाहिजे त्या ठिकाणी ते जातात. पिंपरीत रस्त्यावरून जात असताना, त्यांची भेट झाली. त्या वेळी त्यांनी त्यांचा जीवनप्रवास विशद केला.
नाणेकर म्हणाले, ‘‘जन्मताच अपंगत्व आले. अपंग आहे, म्हणून आपण इतरांपेक्षा कमी आहोत, ही भावना कधीही मनात आली नाही. जग सुंदर आहे, जीवन चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे. हीच भावना आहे. अपंग असल्याबद्दल कधीही दु:ख वाटले नाही.’’ आतापर्यंत पायावर तब्बल १२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. बालपण अत्यंत खडतर गेले. अपंगांच्या शाळेत औरंगाबादला शिक्षण झाले. संरक्षण खात्यात पुण्यात सीएमईमध्ये नोकरी मिळाली. सद्या सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहे. पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. दोन्ही मुले आयटी क्षेत्रात काम करतात. पत्नी आणि मी असे दोघे दर महिन्याला थेऊरला गणपतीच्या दर्शनाला दुचाकीवरून जातो. सोलापूर, करमाळा येथे सासूरवाडीला अनेकदा दुचाकीवरून जाऊन आलो आहे. एकदा गोव्याला सहलीला जाऊनही आलो.
घरात बसून काय करणार? फिरले पाहिजे, जग पाहिले पाहिजे म्हणून भटकंती करतो आहे. दुचाकीवर विविध ठिकाणी फिरण्याचा छंद जोपासला आहे. ज्या स्कूटरवर फिरतो आहे, त्या स्कूटरने तब्बल ३२ वर्षे साथ दिली आहे. आता स्कूटरचे सारखे काम निघते. नादुरुस्त होते़ यंत्र थकले, मी मात्र थकलो नाही. मनात भटकंतीची जिद्द कायम आहे. घरातून दुचाकीवर बाहेर पडतो, त्या वेळी घरातील कोणालाही माझी चितां वाटत नाही. अडचण आली तरी कोणाचीही मदत मिळणार याची त्यांना खात्री आणि विश्वास आहे. दुचाकी बदलून पंजाब दौरा करण्याचा मनोदय आहे.