मगर मैदानाचे गोदाम, दुरवस्था झाल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:56 AM2018-05-10T02:56:46+5:302018-05-10T02:56:46+5:30

शाळा व महाविद्यालयांना सुटी असल्याने अण्णासाहेब मगर मैदानामध्ये खेळाडूंची गर्दी होत आहे. परंतु मैदानामध्ये सोईसुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होते. स्वच्छता नसल्याने व परिसरात अतिक्रमणाचा राडारोडा टाकल्याने मैदानाची रया गेली आहे.

Magar Ground News | मगर मैदानाचे गोदाम, दुरवस्था झाल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर

मगर मैदानाचे गोदाम, दुरवस्था झाल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर

Next

पिंपरी : शाळा व महाविद्यालयांना सुटी असल्याने अण्णासाहेब मगर मैदानामध्ये खेळाडूंची गर्दी होत आहे. परंतु मैदानामध्ये सोईसुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होते. स्वच्छता नसल्याने व परिसरात अतिक्रमणाचा राडारोडा टाकल्याने मैदानाची रया गेली आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी हे मैदान एक चांगला पर्याय आहे. मात्र स्वच्छतेअभावी मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाच्या बाह्य परिसरातून खेळण्याच्या पीचकडे जाण्यासाठी असलेले गेट तुटलेल्या अवस्थेत आहे. त्या ठिकाणी काटेरी झुडपे वाढलेली आहेत. मैदानाच्या बाजूलाच ब्लॉक, जुन्या विटा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. मैदान परिसरामध्ये कोठेही कचराकुंडी नाही. त्यामुळे जागा दिसेल तिथे कचरा टाकला जातो. परिणामी मैदानामध्ये पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास, खाद्यपदार्थांचे कागद अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच कचरा इतरत्र पडलेला दिसतो.
मैदानामध्ये लहान मुलांचीही वर्दळ असते. त्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र मुलांच्या सुरक्षेसाठी काहीच काळजी या ठिकाणी घेतलेली नाही. मैदानामध्ये गोल बाजूने मोठे दिवे उभारण्यात आले आहेत. मात्र त्यातील काही तुटलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या वायर खांबावर तशाच विखुरलेल्या अवस्थेत आहे. डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत. या उघड्या डीपी मुलांसाठी धोकादायक आहेत. मैदान परिसरामध्ये अनेक भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. बऱ्याचदा ही कुत्री मुलांच्या अंगावर धावून जातात. मैदानाच्या परिसरातील मोकळ्या जागेमध्ये अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेल्या टपºया व हातगाड्यांचे पत्रे टाकले आहेत. त्यामुळे खेळाचे मैदान एखाद्या भंगाराच्या गोदामासारखे भासत आहे.
या मैदानामध्ये अशाप्रकारे अनेक धोकादायक बाबी आहेत, ज्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खेळाडू व लहान मुलांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पालिका
प्रशासनाने मैदानाच्या दुरुस्तीकडे व देखभालीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्लक्ष केल्यामुळे चांगल्या मैदानाची शोभा कमी झाली आहे.
सध्या शहर परिसरामध्ये मैदानांची संख्या अपुरी असल्याने मुलांना रस्त्यावर क्रिकेट खेळावे लागत आहे. परंतु शहर परिसरातील मैदानांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधी आवाज उठवित नसल्याने शहरातील उदयोन्मुख खेळाडुंची गैरसोय होत आहे. त्यामुळे खेळाडुंमधून नाराजीचा सूर निघत आहे.
प्रशासनाने उन्हाळी सुट्टीमध्ये योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे.

खेळण्यासाठी हे मैदान एक चांगला पर्याय आहे; मात्र मैदानात प्रवेश केला, की तेथील अस्वच्छतेमुळे नाकाला रुमाल लावावा लागतो. प्रशासनाने किमान कचराकुंडीची व्यवस्था केली पाहिजे.
- नीतेश भोर (खेळाडू)
‘‘या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मैदानातील इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी केली पाहिजे. जेणेकरून मैदानाची शोभा वाढेल.’’
- जितेंद्र वायकर (खेळाडू)

Web Title: Magar Ground News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.