महाविकास आघाडीकडून टाळ मृदंग घेऊन इंद्रायणी प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर'
By विश्वास मोरे | Published: July 4, 2024 07:16 PM2024-07-04T19:16:25+5:302024-07-04T19:17:13+5:30
नदीमध्ये स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते
पिंपरी : मावळपासून आळंदीपर्यंत वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आळंदीतील सिद्धबेट येथे गुरुवारी एल्गार आंदोलन केले. स्थानिक नागरिक, वारकरी, विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत, टाळ मृदंग वाजवत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर' केला.
पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरापासून इंद्रायणी अक्षरशः फेसाळलेली आहे. तेलकट तवंग दररोज पाण्यावर पसरलेला असतो. याबाबत स्थानिक प्रशासनापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही तोडगा निघालेला नाही. नुकतीच आषाढी पालखी वारी आळंदीतून निघाली. या वारी सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांना प्रदूषित इंद्रायणीचे फेसाळलेले पाणी ' आचमन' करावे लागले. यामुळे वारकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या. या भावना सत्ताधाऱ्यांना, राज्यकर्त्यांना कळाव्यात. यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आळंदीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शना करीता भाविक ही येत असतात. तसेच ते इंद्रायणी काठी येऊन पवित्र इंद्रायणी नदी मध्ये स्नान करतात तसेच पवित्र जल आचमन करतात. त्यामुळे नदीमध्ये स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते. जलप्रदूषणा मुळे नदी काठच्या गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात इंद्रायणी जलप्रदूषणामुळे केळगावातील नागरिकांना अशुद्ध (काळसर रंग) पाण्याचा पुरवठा झाला होता. स्नान करण्यासाठी सुद्धा अयोग्य असा पाणी पुरवठा त्यावेळी झाला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे जलप्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली नाही त्याला शासन जबाबदार आहेत. तसेच या जलप्रदूषणा वर आळा बसण्यासाठी जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्कता आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून इंद्रायणी नदी वाहते. म्हणून दरवर्षी जलपर्णी काढणे , नाल्यांची सफाई, ट्रीटमेंट प्लांट, रिव्हर सायक्लोथॉन अशी दुकानदारी पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सुरू आहे. सत्ताधारी भाजपने या दुकानदारीच्या नावाखाली कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे. इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्यामुळेच इंद्रायणीची आज गटारगंगा झाली आहे . या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी आंदोलनात करण्यात आली.
आळंदीतील वारकरी काय म्हणतात
- माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितले वर्षभर इंद्रायणी नदीचे पाणी स्वच्छ राहील. आणि पुढील ४८ तासात इंद्रायणी चे पाणी स्वच्छ दिसेल पण अजून पाणी अस्वच्छ दिसत आहे.
- करोडो रुपयांचा खर्च होऊन सुद्धा जर आमच्या वारकऱ्यांचे श्रध्दा स्थान असलेल्या इंद्रायणी मातेला मोकळा श्वास मिळत नसेल तर नक्की हा पैसा जातो कुठे? याचे उत्तर आता मिळाले पाहिजे.
- नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नमामि इंद्रायणी चे खोटे गाजत किती दिवस दाखवणार आहेत.
- नदीच्या काठावर काही ठिकाणी भराव टाकण्यात आले आहेत. अनेकांची हॉटेल इंद्रायणी काठी आहेत त्याचे सांडपाणी व मैला मिश्रित पाणी येत आहे.