‘‘महाद्या कोयता दे रे, इथे कोणी थांबला तर कापून टाकीन’’ कोयत्याच्या धाकाने तरुणाला लुटले
By नारायण बडगुजर | Published: March 28, 2024 04:02 PM2024-03-28T16:02:53+5:302024-03-28T16:04:19+5:30
चिखली येथील शरदनगरमध्ये स्पाईन रोडच्या सेवा रस्त्यावर २५ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली....
पिंपरी : महाद्या कोयता दे रे,,, इथे कोणी थांबला तर कापून टाकीन, असे म्हणत दहशत केली. तसेच कोयत्याच्या धाकाने पादचारी तरुणाला लुटले. त्याला मारहाण केली. चिखली येथील शरदनगरमध्ये स्पाईन रोडच्या सेवा रस्त्यावर २५ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.
राजकुमार महादेव कल्याणी (२४, रा. डुडुळगाव, मोशी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २७) फिर्याद दिली. प्रकाश उर्फ गणेश श्रीगोंड (२०, रा. काळेवाडी, पिंपरी) आणि त्याचा साथीदार महादेव धोंडाप्पा दिंडुरे (२०, रा. पिंपरी, मूळ रा. सोलापूर) या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजकुमार हे पायी चालत जात असताना प्रकाश आणि त्याचा साथीदार महादेव तेथे दुचाकीवरून आले. ए थांब कुठे जातो मला ५०० रुपये दे, असे प्रकाश म्हणाला. माझ्याकडे पैसे नाहीत, असे राजकुमार म्हणाले. त्यामुळे चिडून प्रकाशने शिवीगाळ केली. तुला पहिल्यांदाच पैसे मागतोय तर तू मला नाही म्हणतोस, असे म्हणून प्रकाश म्हणाला. त्यानंतर राजकुमार यांची यांना मारहाण केली. महाद्या कोयता दे रे, असे प्रकाश त्याच्या साथीदाराला म्हणाला. त्यानंतर साथीदाराने त्याच्या शर्टच्या आतून कोयता काढून प्रकाशला दिला. प्रकाशने तो कोयता राजकुमार यांच्यावर उगारला. त्यांना घाबरवून त्यांच्याकडील ९०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
त्यानंतर राजकुमार यांना लाथांनी मारहाण करून दुखापत केली. तेव्हा रस्त्याने जाणारे लोक राजकुमार यांच्या मदतीसाठी थांबले असता प्रकाशने कोयता हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. इथे कोणी थांबला तर कापून टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे लोक त्याला घाबरून निघून गेले. त्यानंतर प्रकाश आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून निघून गेले. सहायक पोलिस निरीक्षक उद्धव खाडे तपास करीत आहेत.